महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन? उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात…!

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन? उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात…!

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागलेले असताना पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील काही दिवसांपूर्वी कोरोनाचे रुग्ण वाढत असून त्यावर राज्यात पुन्हा निर्बंध लागू केले जातील असे सूतोवाच त्यांनी केले होते. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्रकारांनी यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी लॉकडाऊनबद्दल त्यांची भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे राज्यात नक्की लॉकडाऊन लागू होणार आहे की फक्त निर्बंध, याविषयीचा संभ्रम वाढू लागला आहे.

काय म्हणाले अजित पवार?

आज पंढपूरला कार्तिकी एकादशीनिमित्ताने अजित पवार यांनी सपत्निक शासकीय पूजा केली. यावेळी पत्रकारांनी त्यांना विचारणा केली असता अजित पवार म्हणाले, ‘महाराष्ट्रातल्या गोरगरीबांचे हाल करणाऱ्या त्या लॉकडाऊनचं आता नावही नको. लॉकडाऊनकाळात हातावर पोट असणाऱ्यांची अवस्था फारच बिकट झाली. रोजंदारीवर जगणाऱ्या मजुरांना त्याचा मोठा फटका बसला आहे. असं असून देखील केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने लॉकडऊन लागू केल्यानंतर सगळ्यांनी ते आदेश पाळले. पण आता लॉकडाऊनचं नावही नको’, असं ते म्हणाले.

दरम्यान, यावेळी अजित पवारांनी सगळ्यांना सतर्कता बाळगून काळजी घेण्याचं आवाहन केलं. ‘कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत असून आपण सगळ्यांनीच काळजी घेण्याची गरज आहे. जी काही बंधनं आहेत, ती सगळ्यांनीच पाळायला हवीत’, असं ते म्हणाले.

First Published on: November 26, 2020 2:23 PM
Exit mobile version