जयंत पाटील यांना फोन न करण्याच्या प्रश्नाला अजित पवारांनी दिले उत्तर, म्हणाले…

जयंत पाटील यांना फोन न करण्याच्या प्रश्नाला अजित पवारांनी दिले उत्तर, म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सोमवारी (ता. 22 मे) सीबीआयकडून सुमारे साडे नऊ तास चौकशी करण्यात आली. आयएल अँड एफएस प्रकरणी पाटील यांची चौकशी करण्यात आली. पण या चौकशीनंतर अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आलेला आहे. कारण जयंत पाटील यांची ईडीकडून चौकशी करण्यात आल्यानंतर सर्वच नेत्यांकडून त्यांची विचारपूस करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. पण अजित पवार यांनी जयंत पाटील यांची विचारपूस केली नसल्याची माहिती समोर आली आहे. स्वतः जयंत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना याबाबत माहिती दिली. तर अजित पवार यांनी आज (ता. 23 मे) पत्रकार परिषदेत बोलताना जयंत पाटील यांना फोन का केला नसल्याच्या पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर दिले आहे. तर दुसरीकडे मात्र जयंत पाटील हे चौकशीच्या दिवशी एकाकी पडल्याचे दिसून आले. त्यामुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत वादावरून पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. (Ajit Pawar replied to the question of not calling Jayant Patil)

हेही वाचा – “नवाब मलिकांना खोटे ठरवण्याचा प्रयत्न झाला”; वानखेडेंवरून अजित पवारांची टीका

जयंत पाटील यांची सीबीआयडून साडेनऊ तास चौकशी करण्यात आल्यानंतर अजित पवार यांनी त्यांना फोन का केला नाही, याबाबत स्वतः अजित पवार यांनी खुलासा करत सांगितले की, “तपास यंत्रणांना चौकशीचा अधिकार आहे. त्यांनी चौकशीला बोलावल्यावर आमची भूमिका ही सहकार्याचीच असते. स्वत: जयंत पाटील यांनीदेखील हीच भूमिका मांडली आहे. तसेच, मी कोणत्याही नेत्याच्या चौकशीवर प्रतिक्रिया देत नाही. छगन भुजबळ आणि नवाब मलिक यांच्या प्रकरणावरही मी बोललो नव्हतो.”

तर, जेव्हापासून भाजप सत्तेवर आहे, तेव्हापासून मी कोणत्या नेत्याच्या ईडी चौकशीबद्दल बोललो आहे, हे दाखवून द्या. याआधी त्यांनी छगन भुजबळ यांना केंद्रीय तपास यंत्रणेने चौकशीसाठी बोलावले होते. त्यावेळी मी काही वक्तव्य केले असेल तर मला दाखवा. अनिल देशमुख यांना देखील चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्यावेळी मी काही वक्तव्य केले असेल तर दाखवा. प्रफुल्ल पटेल यांच्यावेळी मी काही बोललो असेल तर दाखवा. जयंत पाटील यांना एकट्यालाच ईडीने चौकशीसाठी बोलावलं नाही. माध्यमे जाणिवपुर्वक काही वेगळे अर्थ काढण्याचा प्रयत्न करता. हे चुकीचे आहे, असे म्हणत त्यांनी याबाबत स्पष्टीकरण देत प्रसार माध्यमांनाही खडेबोल सुनावले.

“मी कोणाच्याही चौकशी बाबतीत कोणतेही वक्तव्य करत नाही. माझ्याही बाबतीत आयकर विभागाने 22 ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. त्यावेळीच मी जे बोलायच ते बोललो. त्यानंतर पुन्हा मी माझ्या कामाला लागलो. मात्र, भाजपमध्ये गेल्यांची चौकशी होत नाही. हे स्वतः काँग्रेसमध्ये मंत्रीपदावर राहिलेल्या व्यक्तीकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे सूडभावनेतून चौकशीला बोलवणे चुकीचे आहे,” असे म्हणत अजित पवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

सीबीआयकडून चौकशी झाल्यानंतर नेमके कोणाचे फोन आले याबाबत जयंत पाटील यांना विचारण्यात आले होते. पत्रकारांच्या या प्रश्नाला उत्तर देत जयंत पाटील म्हणाले की, अनेक जणांचे मला फोन आले. फोन आलेल्यापैकी कोणाचंही नाव घेणार नाही. कारण काही नाव सुटून जाण्याची शक्यता आहे. यामुळे एखादे नाव राहिलं तर चूक होईल. यामुळे मी कोणत्याही नेत्याचे नाव घेत नाही. त्याचवेळी त्यांना अजित पवार यांचा फोन आला होता का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्याबाबत बोलताना जयंत पाटील यांनी सरळ उत्तर दिले. नाही, अजित पवार यांचा फोन आला नाही. ज्यानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा केल्या जाऊ लागल्या.

First Published on: May 23, 2023 1:19 PM
Exit mobile version