पुण्यातील राष्ट्रवादीच्या तीन नगरसेवकांचं पक्षाविरोधात बंड, अजितदादांनी केली कानउघाडणी

पुण्यातील राष्ट्रवादीच्या तीन नगरसेवकांचं पक्षाविरोधात बंड, अजितदादांनी केली कानउघाडणी

पुणे महानगरपालिकेतील तीन नगरसेवकांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्याने उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख नेते अजित पवार यांनी त्यांची चांगलीच कानउघडणी केली. पक्षाचे नेते काय भूमिका घेतात, याकडे लक्ष द्यायचे नाही. स्वत:ला वाटेल ते करायचे, हे अजिबात खपवून घेतला जाणार नाही, अशा शब्दात अजित पवार यांनी महापालिकेतील स्थायी समितीमधील पक्षाच्या ‘त्या’ तीन सदस्यांची (नगरसेवक) शुक्रवारी कानउघडणी केली.

पुणे महापालिकेला ठेकेदारी पद्धतीने सुरक्षारक्षक नेमण्याचे काम देण्यासाठी मतदान करण्यात आलं. हे काम भाजप नेत्याच्या ‘क्रिस्टल इंटिग्रेटेड सव्र्हिसेस प्रा.लि.’ या कंपनीला देण्याच्या बाजूने स्थायी समितीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन सदस्यांनी मतदान केले. दरम्यान, गेल्या आठवड्यात पवार यांच्या उपस्थित पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीत या प्रस्तावाला विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी देखील या प्रस्तावाबाबत पक्षाची भूमिका मांडली होती. मात्र, पक्षाच्या समितीतील सदस्यांनी प्रस्तावाला पाठिंबा दिल्याने जगताप यांनी या तिन्ही सदस्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे. दरम्यान, अजित पवार शुक्रवारी पुण्यात आले होते. त्यावेळी जगताप आणि स्थायी समितीतील पक्षाच्या तीन सदस्यांनी त्यांची भेट घेतली. या वेळी पक्ष विरोधी भूमिका घेतल्याबद्दल पवार यांनी या सदस्यांची चांगलीच खरडपट्टी काढली.

‘‘असला फालतूपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही. पक्षाचे नेते काय सांगतात, त्याकडे लक्ष द्यायचं नाही. स्वत:ला वाटेल ती भूमिका घ्यायची आणि निवडणुका जवळ आल्या की पक्षाकडे तिकिटासाठी भांडायचे. तुमच्या चुकीच्या वागण्यामुळे पक्षाची प्रतिमा मलीन होते. येथून पुढे असलेले प्रकार खपवून घेतले जाणार नाही,” अशा शब्दात अजित पवार यांनी त्या तीन नगरसेवकांना सुनावलं.

 

First Published on: September 4, 2021 1:33 PM
Exit mobile version