सरकारच्या करंटेपणामुळे बेकारी वाढली – अजित पवार

सरकारच्या करंटेपणामुळे बेकारी वाढली – अजित पवार

अजित पवार यांचा विश्वास

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ नेते अजित पवार यांनी पुन्हा एकदा पक्ष सोडून जाणाऱ्यांवर टीका केली आहे. राजकारणात आता निष्ठेला महत्त्व राहिलेले नाही, असे अजित पवार म्हणाले आहेत. यासोबतच अजित पवार यांनी भाजप सरकारवरही जोरदार टीका केली. तुम्ही पाच वर्षात चांगलं काम केलं असेल तर यात्रा कशासाठी काढता? असा सवाल अजित पवार यांनी केला आहे. ‘यात्रा काढावी लागणे म्हणजे हे सरकारचे अपयश आहे’, अशी टीका अजित पवार यांनी वाशिम येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. त्याचबरोबर सरकारच्या करंटेपणामुळे बेकारी वाढल्याचे ते म्हणाले. ‘जे पक्ष सोडून गेले त्यांना पक्षाने खुप काही दिले तरी ते गेले. पुर्वी निष्ठा होती. परंतु आता निष्ठेला महत्व राहिलेले नाही. जाणाऱ्यांना भीती, प्रलोभने दाखवली जात आहे. आम्ही १५ वर्ष सत्तेत होतो. विरोधी पक्षाच्या लोकांना फोडण्याचा प्रयत्न आम्ही कधी केला नाही. महाराष्ट्रात असं कधी घडलं नव्हतं, ते आज घडतंय’, असेही अजित पवार म्हणाले. या पत्रकार परिषदेला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार राहुल पोटे आदी उपस्थित होते.

हेही वाचा – अजित पवार आणि गिरीश महाजन यांच्यात रंगलाय कलगीतुरा

नेमके काय म्हणाले अजित पवार?

‘पाच वर्षात राज्याला या सरकारने कंगाल करुन टाकले आहे. सरकारने ५ लाख कोटीचे कर्ज करुन ठेवले आहे. निव्वळ आश्वासन दिली जात आहेत. सरकारच्या करंटेपणामुळे बेकारी वाढली आहे. क्राईम मोठ्या प्रमाणात वाढले आहे. हे सगळे संपवायचे असेल तर आघाडीला निवडून द्या’, असे आवाहन अजित पवार यांनी केले. यावेळी ‘सामना’ हे शिवसेनेचे मुखपत्र आहे त्यामुळे आम्ही विरोधक आहोत. आमच्यावर ते टिकाच करणारच, कौतुक थोडे करणार आहे, असेही पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार यांनी सांगितले. त्याचबरोबर ‘भाजप पक्षाने नवीनच पद्धत अवलंबली आहे. ते निवडून येण्याची क्षमता कोणाची आहे याचा अंदाज बघतात आणि त्यांना गोळा करत आहेत’, असे अजित पवार म्हणाले.


हेही वाचा – नाशकात अजित पवारांविरोधात फलकबाजी

First Published on: August 20, 2019 12:13 PM
Exit mobile version