‘या’ भीतीतून भाजपचा शरद पवारांवर आरोप; जयंत पाटलांचा दावा

‘या’ भीतीतून भाजपचा शरद पवारांवर आरोप; जयंत पाटलांचा दावा

धाराशिव – राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आरोप करण्याची हल्ली पद्धत सुरू झाली असून आता पवारसाहेबांवरही आरोप केले जात आहे. जाणीवपूर्वक असे आरोप करून राष्ट्रवादीला बदनाम करण्याचे काम भाजप करत आहे. भाजपला राष्ट्रवादीच सक्षमपणे उत्तर देत आहे म्हणून भाजपला भीती वाटत असावी असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

पत्राचाळ प्रकरणी भाजपकडून धादांत खोटे आरोप

पत्राचाळ प्रकरणी धादांत खोटे आरोप भाजपचे लोक करत आहेत. हे फार जुने प्रकरण आहे. त्यावेळी पत्राचाळीतील रहिवासी पुनर्वसनासाठी अनेकांची भेट घ्यायचे. देशाचे नेते असल्याने पवारसाहेबांचीही त्यांनी भेट घेतली. मी मुंबईचा पालकमंत्री असताना ते मलाही भेटले होते. त्यात काही गैर नाही असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

मराठवाड्यात महाविकास आघाडीसाठी चांगली परिस्थिती आहे. लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद राष्ट्रवादीला मिळत आहे. सत्ताबदल लोकांना पटलेला नाही, लोक यांच्या विरोधात आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण बारामतीत येणार आहे ही फार चांगली बाब आहे. बारामतीतील मतदार सुज्ञ आहेत. देशात पेट्रोल – डिझेलचे दर का वाढले आहेत, स्टील व इतर धातूंचे दर का वाढले आहे, देशाची प्रगती होण्याऐवजी नुकसान का होत आहे ? अर्थव्यवस्था संकटात का? अन्नधान्यावर जीएसटी का? असा प्रश्न लोकांना पडलेला आहे. भाजपने बारामतीकरांना उत्तर देण्यासाठी थेट अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनाच पाचारण केले आहे त्याबद्दल जयंत पाटील यांनी भाजपचे आभार मानले.

 प्रचंड विकास पाहण्यासाठी कदाचित सितारामण बारामतीत

बारामतीत प्रचंड विकास झाला आहे, तो विकास पाहण्यासाठी कदाचित निर्मला सितारामण यांनी बारामती मतदारसंघ मागून घेतला असावा. आपण निवडून आलेल्या भागाचा विकास व्हायला पाहिजे अशी प्रत्येकाची इच्छा असते मात्र दिशा मिळत नाही. विकासाचे आदर्श मॉडेल बारामतीत आहे. हा मॉडेल पाहण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री येत असाव्यात असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला .

४० जणांना एकत्र ठेवणे, त्यांना सांभाळणे, शिवसेनेवर हक्क सांगणे, सुप्रीम कोर्टाच्या केसकडे लक्ष देणे, गेल्या तीन महिन्यात मुख्यमंत्र्यांना यापलीकडे काहीच सुचत नाही. परिणाम काय तर लाखो – कोटींचा वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून निसटून गुजरातला जातो. एवढी मोठी गुंतवणूक परराज्यात गेली, महाराष्ट्राचे मोठे आर्थिक नुकसान झाले, तरुणांचा रोजगार गेला याची आठवणही जयंत पाटील यांनी करुन दिली.

वेदांताचे अनिल अग्रवाल यांना भेटणे ही मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे मात्र प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे ते घाबरत आहेत. ते आम्हाला सांगत आहेत की, थांबा दुसरा प्रकल्प येतो आहे. त्यांनी जे केले आहे ते नीट करण्यातच त्यांचा वेळ जात आहे. महाराष्ट्राचा शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याला मदत नाही याबाबत जयंत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.


ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस एक नंबरवर; पवारांनी फेटाळला भाजपचा दावा

First Published on: September 21, 2022 6:51 PM
Exit mobile version