देवेंद्र फडणवीसांचा स्कल कॅपमधील फोटो पोस्ट करत आंबादास दानवे म्हणाले, जिनके घर शीशे के….

देवेंद्र फडणवीसांचा स्कल कॅपमधील फोटो पोस्ट करत आंबादास दानवे म्हणाले, जिनके घर शीशे के….

मुंबई – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)  (Shivsena) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज (रविवार) शिवगर्जना सभा नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये होत आहे. या सभेसाठीचे मालेगावात मराठी आणि उर्दूमध्ये बॅनर लागले आहेत. यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)
यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला ‘अली सेना’ म्हणत त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले असल्याची टीका केली.

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे-फडणवीसांना जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे. विरोधी पक्षनेते दानवे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा मुस्लिम स्कल कॅप घातलेला फोटो आणि एकनाथ शिंदे यांचे अब्दुल सत्तार यांनी उर्दू भाषेत लावलेल्या बॅनरचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
दानवेंनी हे फोटो पोस्ट करताना म्हटले आहे, ‘जनाब एकनाथ शिंदे ये भी देख लो… नंतर उद्धव साहेबांवर टीका करा. कारण तुमची तेवढी पात्रता नाही.’

दानवेंनी पोस्ट केलेल्या फोटोमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुस्लिम धर्मगुरुंसमोर भाषण करताना दिसत आहेत. फडणवीसांनी बोहरा मुस्लिम वापरतात तशी स्कल कॅप परिधान केलेली आहे. हा फोटो पोस्ट करताना दानवेंनी लिहिले आहे, जिन के घर शीशे के बने होते है, वो दुसरों पर पत्थर नहीं फेंकते…

शिंदे आणि फडणवीस हे मुस्लिम समुदायासमोर गेले असताना, त्यांचेही पारंपरिक पद्धतीने स्वागत झाले आहे. मालेगावात ठाकरेंच्या स्वागतात उर्दू भाषेत बॅनर झळकल्याने शिंदे – फडणवसींनी त्यांच्यावर तोंडसुख घेतले होते. त्याला आता दानवेंनी त्यांच्याच भाषेत उत्तर दिले आहे.

याआधी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले होते, की या देशात अजून कोणत्याही भाषेवर बंदी आलेली नाही. त्यामुळे उर्दूत बॅनर लागले असतील तर त्यात काही वावगे नाही. त्यासोबत त्यांनी जावेद अख्तर आणि गीतकार गुलजार हे आजही उर्दूत लिहितात आणि बोलतात. त्यांची गीते आणि पाकिस्तानत जाऊन त्यांनी पाकिस्तानींची केलेली कान उघाडणी तुम्हाला कशी चालते? असाही सवाल केला.

First Published on: March 26, 2023 5:37 PM
Exit mobile version