शिंदे गटाची किंमत कमी करण्यासाठी भाजप फोडाफोडी करत आहे- अंबादास दानवे

शिंदे गटाची किंमत कमी करण्यासाठी भाजप फोडाफोडी करत आहे- अंबादास दानवे

राजकारणातील चाणक्य म्हणून ओळख असलेल्या शरद पवार यांच्या घरातच आता बंडाळी होणार आहे. हे बंड एकनाथ शिंदे यांच्या बंडापेक्षाही मोठा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादीत गेल्या काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या चर्चा आणि या चर्चांना दुजोरा देणाऱ्या काही घडामोडी पाहता आता यावर महाविकास आघाडीतील नेत्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी यावर आपली प्रतिक्रिया दिलीय.

शिंदे गटाची किंमत कमी करण्यासाठी भाजप फोडाफोडी करत आहे. पण भाजपचं हे फोडाफोडीचं राजकाऱण फार काळ टिकणार नाही, असं अंबादास दानवे म्हणाले. “अजित पवार हे राष्ट्रवादी कॉंग्रेस विधिमंडळाचे नेते आहेत. त्यामुळे फक्त ४० नाहीत तर सगळे आमदार त्यांच्यासोबत आहेत. या सगळ्या चर्चांवर अजित पवार यांनी स्वतः यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे. भाजपसोबत जाण्याचा कुठलाही विचार नसल्याचं अजित पवार यांनी सांगितलेलं आहे. अजित पवारांवर शंका घेणं हे चुकीचं ठरेल. राष्ट्रवादी पक्ष फुटीच्या वाटेवर आहे, असं मला वाटत नाही.”, असं देखील अंबादास दानवे म्हणाले.

हे ही वाचा: मी कोणालाही उत्तर द्यायला बांधिल नाही; अजित पवारांचे स्पष्टीकरण

“भाजप हा फोडाफोडीचं राजकारण करत असतं. कर्नाटक सारख्या राज्यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राहिलेल्या लोकांना पक्ष सोडावा लागतो. स्वतःच्याच पक्षातील लोकांना हाकलून दिलंय आणि दुसऱ्या पक्षातून घेतलेल्या लोकांना तिकीट दिलंय. आमच्या पक्षातील ४० गद्दार त्यांच्या भाजपमध्ये गेले, मग त्यांच्या पक्षातील लोकांनी कुठे जायचं? त्यामुळे भाजपाचं हे फोडाफोडीचं राजकारण फार काळ टिकणार नाही.”, असं वक्तव्य देखील अंबादास दानवे यांनी केलंय.

हे ही वाचा: जिथे दादा तिथं मी, लवकरच समीकरणं बदलतील; राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराचं खळबळजनक वक्तव्य

यापुढे बोलताना दानवे म्हणाले की, “महाविकास आघाडीच्या पुढील सभा सगळ्या अजित पवारांनीच ठरवल्या आहेत. त्यांनीच पुढे येऊन या सभांचं नियोजन केलेलं आहे. त्यामुळे अजित पवार हे नाराज आहेत, असं मला वाटत नाही.”

हे ही वाचा: अजित पवार भाजपसोबत जातील असं मला वाटत नाही- नाना पटोले

यावेळी दानवेंनी भाजपवर तिखट शब्दात टीका देखील केलीय. “शिंदे गटाची किंमत आजही नाही. अजित पवार हे भाजपासोबत जाणार तर नाहीच. पण मुर्खाच्या नंदनवनात शिंदे गट आहेत. एकनाथ शिंदे यांची किंमत कमी करण्यासाठीच भाजप फोडाफोडीचं राजकारण करत आहे, हे शिंदे गटाच्या लक्षात येत नाही.”, असं म्हणत अंबादास दानवेंनी भाजपवर आरोप केलाय.

First Published on: April 18, 2023 12:14 PM
Exit mobile version