अरे बापरे, यामुळे झाला नाशिकमधील अ‍ॅम्बुलन्सचालकाला करोना

अरे बापरे, यामुळे झाला नाशिकमधील अ‍ॅम्बुलन्सचालकाला करोना

अरे बापरे, यामुळे झाला नाशिकमधील अ‍ॅम्बुलन्सचालकाला करोना

आजवर ५००पेक्षा अधिक रुग्णांना ज्याने वेळेत हॉस्पिटलपर्यंत पोहोचवले, त्यातील ५० पेक्षा अधिक रुग्ण पॉझिटिव्ह असूनही कोणतीही कानकूच न करता जीवावर उदार होत त्यांची वाहतूक केली.. बरे झालेल्या रुग्णांना सुखरुप घरी आणले त्या अ‍ॅम्बलुन्सचालकालाही करोनाने घेरले. मोरवाडी रुग्णालयात कार्यरत या चालकाने पीपीई किट, ग्लोव्ज, सॅनिटायझरचा नित्याने वापर अशा सुरक्षिततेच्या साधनांचा उपयोग करुनही या चालकाला करोनाची बाधा झाल्याने त्याला स्वत:लादेखील धक्का बसला आहे. हा आजार कशामुळे जडला असेल याचा अतिशय धक्कादायक अंदाज त्याने ‘आपलं महानगर’शी बोलताना वर्तवला.

करोनाशी चार हात करण्यासाठी डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ यांच्यासह रुग्णालयांशी संबंधित कर्मचारी निकराचा लढा देत आहे. हा लढा देताना अनेकांना करोनाची बाधाही होत आहे. महापालिकेच्या मोरवाडी येथील रुग्णालयात कार्यरत असलेल्या रुग्णवाहिकेच्या चालकालाही करोनाची बाधा झाली. या चालकाने आजवर ६०० पेक्षा अधिक रुग्णांना गेल्या अडीच महिन्यांच्या काळात झाकीर हुसेन रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयापर्यंत आपल्या रुग्णवाहिकेने सोडले.

अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या हस्ते काही दिवसांपूर्वीच या अ‍ॅम्बूलन्सचालकाचा सत्कार करण्यात आला होता.

कामात कोणताही कंटाळा न करता कॉल येताच काही क्षणातच रुग्णापर्यंत पोहचण्याची या चालकाची हातोटी आहे. स्वत: कंत्राटी कर्मचारी असूनही कायम कर्मचार्‍याला लाजवेल अशी कामगीरी त्याची आहे. ‘रुग्णसेवा हीच इश्वरसेवा’ हे ब्रिद घेऊन हा चालक कार्यरत असतो. काही दिवसांपूर्वी त्याला घसा दुखीचा त्रास होऊ लागला. त्यानंतर सौम्य स्वरुपाचा तापही आला. त्यामुळे त्याची करोनाची टेस्ट केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. मात्र आजवर असंख्य रुग्णांना हॉस्पिटलपर्यंत घेऊन जाणे आणि डिस्चार्ज मिळाल्यावर त्यांना घरापर्यंत घेऊन येण्याचे काम त्याने केलेले असल्यामुळे रिपोर्ट बघून तो फारसा हबकला नाही. डॉक्टरांच्या सूचनांचे पालन काटेकोरपणे केले तर हा आजार कंटाळून निघून जाईल यावर त्याचा ठाम विश्वास आहे. या विश्वासानेच तो नाशिकरोड येथील रुग्णालयात दाखल झाला. तेथे डॉ. धनेश्वर यांनी केलेल्या समुपदेशनामुळे त्याच्यातील इच्छाशक्ती अधिक प्रबळ झाली. त्यातून आता हा चालक पूर्णपणे बरा होण्याच्या उंबरठ्यावर आहे. या ‘करोना योध्या’शी ‘आपलं महानगर’ने संपर्क साधत त्याचा अनुभव जाणून घेतला. सुरक्षिततेच्या सर्वच साधनांचा वापर करुनही तो करोनाने बाधित कसा झाला हे ‘आपलं महानगर’ने जाणून घेतले. यावेळी चालकाने व्यक्त केलेला अंदाज हा धक्कादायक आहे.

या दोन कारणांपैकी एकाने झाला अ‍ॅम्बुलन्सचालकाला करोना:

काही दिवसांपूर्वी चक्रीवादळ आले होते. त्या दिवशी रात्रीच्या सुमारास भर पावसात मी एका पॉझिटिव्ह रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. यावेळी रुग्णाशी संपर्क आला, पण अंगावर पीपीई किट होते. पावसाचे थेंब हे पीपीई किटच्या शिलाईमधून आत गेल्याचे माझ्या लक्षात आले. कदाचित या थेंबातून विषाणूचा शिरकाव झाला असावा. तसेच एका रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर सॅनिटायझरने रुग्णवाहिका निर्जंतूक करण्यात आली. पण त्यावेळी सॅनिटायझरचा वापर अती झाल्यामुळे त्यात बसणे रुग्णांना त्रासदायक होत होते. म्हणून मी रात्रीच्या सुमारास रुग्णवाहिका पाण्याने साफ केली. यावेळी सुरक्षीततेची साधन अंगावर नसल्याने करोनाची बाधा झाली असावी. या दोनपैकी एक कारण बाधा निर्माण करणारे ठरले असावे.

– अ‍ॅम्ब्युलन्स चालक, मोरवाडी रुग्णालय

First Published on: June 9, 2020 9:32 PM
Exit mobile version