गृहमंत्री अमित शाहांचा नागपूर दौरा रद्द, ‘हे’ आहे कारण; एकनाथ शिंदे जाणार होते स्वागताला

गृहमंत्री अमित शाहांचा नागपूर दौरा रद्द, ‘हे’ आहे कारण; एकनाथ शिंदे जाणार होते स्वागताला

राज्यात घडणाऱ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दौरा महत्त्वाचा मानला जात होता. या भेटीदरम्यान अमित शाह भाजपच्या अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन काही निर्णय घेण्याची शक्यता होती. मात्र शाह यांचा नागपूरचा दोन दिवसांचा दौरा रद्द झाला आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्या मृत्यूमुळे दोन दिवसांचा दुखवटा घोषित करण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी आपला नागपूरचा दौरा रद्द केला आहे.

डॉ. आबाजी थत्ते सेवा आणि संशोधन संस्था संचालित नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संस्थेचे मुख्य संरक्षक आहेत. या सोहळ्याला गृहमंत्री येणार असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल(बुधवार) नागपुरात दाखल झाले होते. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर शाहांचा हा चौथा दौरा होणार होता. परंतु प्रकाशसिंग बादल यांच्या मृत्यूमुळे पंजाबमध्ये दोन दिवसांचा दुखवटा घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांनी नागपूर दौरा रद्द केला आहे.

सरसंघचालक मोहन भागवतांच्या हस्ते नागपूरमध्ये कॅन्सर इन्स्टिट्यूटचे लोकार्पण करण्यात येणार आहे. जामठा येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे उद्धाटन अमित शाह यांच्या हस्ते होणार होतं. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेण्यात आली होती. तसेच पोलीस आयुक्तांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक देखील बोलावली होती.

सत्तासंघर्षाच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्रसह देशाचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्र्यांसह १६ आमदारांचे पुढील राजकीय भविष्य काय असणार?, आणि भविष्यात महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढील दिशा कशी असेल हे निश्चित होणार आहे.


हेही वाचा : आता भाकरी फिरवायची वेळ आलीय; शरद पवारांनी दिले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बदलाचे संकेत


 

First Published on: April 27, 2023 9:52 AM
Exit mobile version