निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीला अंतर्गत वादाचा फटका

निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीला अंतर्गत वादाचा फटका

महाराष्ट्र एकिकरण समिती

कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीत मराठी विरुद्ध मराठी या संघर्षाचा फटका महाराष्ट्र मध्यवर्ती एकीकरण समितीला बसला आहे. मतांच्या विभाजनामुळे एकीकरण समितीच्या तिन्ही उमेदवारांचा पराभव झाला आहे. तर बेळगावातील १८ पैकी १० मतदारसंघामध्ये भाजपाने आघाडी घेतली आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वीची उपांत्य लढत म्हणून पहिल्या जात असलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मराठी भाषिकांच्या लढ्याचे भवितव्यही लपले होते. बेळगाव दक्षिणमधून प्रकाश मरगाळे, ग्रामीणमधून मनोहर किणेकर, खानापूरमधून आमदार अरविंद पाटील या तिघांना मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने उमेदवारी दिली होती. पण या उमेदवारांविरोधात प्रत्येक मतदारसंघात महाराष्ट्र एकीकरण समितीचे बंडखोर उमेदवार उभे ठाकले. यामुळे मतांचे विभाजन झाले आणि बेळगावात एकीकरण समितीला खाते देखील उघडता आलेले नाही. या तिन्ही जागांवर एकीकरण समितीचे उमेदवार पिछाडीवर आहेत.

२००८ मध्ये झालेल्या निवडणुकीत समितीच्या एकाही उमेदवाराला विजय मिळाला नव्हता. तर २०१३ मध्ये एकीकरण समितीने पाच मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले होते. यातील दोन जागांवर त्यांचा विजय झाला होता.
मागील विधानसभा निवडणुकीत समितीला अंतर्गत गटबाजीचा फटका बसला होता. यंदा देखील ही गटबाजी संपवण्यात यश आलेले नाही. महाराष्ट्र एकीकरण समिती आणि महाराष्ट्र मध्यवर्ती एकीकरण समिती यांच्यातील जुन्या वादामुळे पुन्हा एकदा मराठी उमेदावारांची डोकेदुखी वाढली.

First Published on: May 16, 2018 3:00 PM
Exit mobile version