अनिल देशमुख यांना झटका न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ

अनिल देशमुख यांना झटका न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ

राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना मनी लाँड्रिंगप्रकरणी मुंबईतील विशेष न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. अनिल देशमुख यांचा कोठडीतील मुक्काम आता आणखी वाढला आहे. विशेष न्यायालयाने त्यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ केली आहे. त्यामुळे त्यांना आता १३ मेपर्यंत कोठडीत राहावे लागणार आहे.

अनिल देशमुख यांचे स्वीय सचिव संजीव पलांडे, स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे आणि बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनाही १३ मेपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला दरमहा १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले होते, असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता. याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीनेदेखील या प्रकरणात कारवाईस सुरुवात केली.

अनिल देशमुख हे अटकेत असून त्यांचा ताबा सीबीआयकडे आहे. सीबीआय कोठडीनंतर त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले. न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यानंतर शुक्रवारी त्यांना विशेष कोर्टात हजर करण्यात आले. अनिल देशमुख यांना सीबीआय कोठडी देण्याची मागणी सीबीआयने यावेळी केली, मात्र विशेष न्यायालयाने ही मागणी फेटाळत देशमुख यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

First Published on: April 30, 2022 4:55 AM
Exit mobile version