तुमच्या राज्यात जगायची इच्छा नाही; वाईन विक्रीच्या निर्णयाविरोधात अण्णा हजारेंची प्रतिक्रिया

तुमच्या राज्यात जगायची इच्छा नाही; वाईन विक्रीच्या निर्णयाविरोधात अण्णा हजारेंची प्रतिक्रिया

मला दु:ख नाही, त्याने माझं ऐकलं नाही; केजरीवाल यांच्या अटकेवर अण्णा हजारेंची प्रतिक्रिया

राज्य सरकारच्या सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीच्या निर्णयाविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ठाम आहेत. यामुळे अण्णा हजारे उद्यापासून उपोषणाला बसणार आहेत. मात्र “सरकारच्या या निर्णयामुळे मला जगण्याची इच्छा राहिली नाही. तुमच्या सरकारला निरोप पोहोचवा,” असं अण्णा हजारे म्हणाले आहेत. राळेगणसिद्धीतील एक जाहीर सभेत अण्णा हजारे बोलत होते.

“महाराष्ट्रात आज दारु कमी आहे का? बिअर बारची शॉप बाजारात पाहतो, परमीट रुमही पाहतो, वाई शॉपची दुकानंही उघडली आहेत त्याठिकाणी वाईन मिळते ना? मग सरकारने परत दुकानात वाईन विक्रीसाठी का ठेवली? एवढी दुकानं असताना किराणा दुकान, सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी का ठेवली? म्हणजे सर्व लोकांना व्यसनाधीन बनावयचे आहे का? लोकं व्यसनाधीन झाले की, आपल्याला काय साधायचे आहे ते साधता येतात,” असा आरोप महाविकास आघाडी सरकारवर केला आहे.

“व्यसनाने बर्बाद झाले लोकं. युवाशक्ती आमची राष्ट्र शक्ती आहे, ही बालकं आमची संपत्ती आहे, ही बालकचं व्यसनाच्या अधिन गेली तर काय होणार? मला राळेगणसिद्धीसाठीच वाईट वाटत नाही तर महिला मुलांवर खूप अन्याय अत्याचार होतील. म्हणून सरकारला निरोप पाठवला त्यानंतर सरकारचे लोक चार ते पाच दिवस चर्चेला आले, सगळं ऐकून घेतलं. त्यांना उत्तर म्हणून एकचं सांगितलं की, मी सगळं ऐकलं पण माझा एक निरोप सरकारला सांगा की, तुमच्या राज्यात मला जगायची इच्छा राहिली नाही. मग हालचाली सुरु झाल्या आहेत,” असही अण्णा हजारे म्हणाले आहेत.

“हा प्रश्न राळेगणचा नाही तर राज्याचा आहे. वाईन ही आपली संस्कृती आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात वाईन? ही संस्कृती आहे का? ज्ञानेश्वर, तुकाराम महाराजांच्या राज्यात वाईन ही संस्कृती आहे का? महाराष्ट्राची मुळ संस्कृती जतन करण्यासाठी आज किर्तनकार किर्तन करत आहेत. किराणा दुकानात ही वाईन ठेवून ही संस्कृती बरबाद करायला निघाले आहेत. या सरकारच्या निर्णयामुळे मला जगायची इच्छा नाही. ८४ वर्ष खूप झाले. जगून घेतलं. आता जगायची इच्छा नाही,” असं अण्णा म्हणाले.

“राज्याचे एक मोठे अधिकारी माझ्याकडे आलेत. त्यांनी सांगितलं की जनतेचं मत घेऊन आम्ही निर्णय घेऊ. पण, मी माझ्या उद्याच्या उपोषणावर कायम आहे. मी लग्न केलं नाही. पण, माझा प्रपंच सुरू आहे. समाजासाठी मी लढतो आहे. मरताना देखील मी समाजासाठी मरणार आहे,” असंही अण्णा म्हणाले.


 

First Published on: February 13, 2022 1:16 PM
Exit mobile version