आणखी एक उंटांचा मृत्यू, तर मालेगावात एका उंटाचा जन्म; ‘रायका’ दाखल, बुधवारी परतीच्या प्रवासाला सुरवात

आणखी एक उंटांचा मृत्यू, तर मालेगावात एका उंटाचा जन्म; ‘रायका’ दाखल, बुधवारी परतीच्या प्रवासाला सुरवात

नाशिक : पेठ, धुळे मार्गे नाशिकमध्ये दाखल झालेल्या उंटांना नाशिकमधील वातावरण मानवत नसल्याने आतापर्यंत नाशिकमध्ये आठ तर मालेगावमधे एक अशा नउ उंटांचा मृत्यु झाला. याचबरोबर अनेक उंटावर उपचार करण्यात येऊन जवळपास उर्वरित 146 उंटांच्या घरवापसीसाठी नाशिक प्रशासनाकडून प्रयत्न सुरू झाले असून मंगळवारी नाशिकमध्ये रायका दाखल होणार असून बुधवारी सकाळी पहाटेच्या सुमारास उंटांचा राजस्थानच्या दिशेने प्रवास सुरू होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मागील आठवड्यात नाशिक शहरासह जिल्ह्यात अचानक शंभरहून अधिक उंटांचा तांडा दाखल झाला. त्यानंतर शहरासह जिल्ह्यात चर्चाना उधाण आले. मात्र चर्चांना पूर्ण विराम मिळाल्यानंतर प्रशासनासह पोलिसांनी सावध भूमिका घेत 111 उंटांना नाशिकच्या पांजरापोळ येथील गोशाळेत उपचारासाठी ठेवण्यात आले तर नंतरच्या काही उंटांना मालेगाव येथील गोशाळेत ठेवण्यात आले. त्यामुळे जवळपास सहा ते सात दिवसांपासून या उंटावर पशुवैद्यकीय अधिकार्‍यांमार्फत, डॉक्टरांमार्फत तपासणी करण्यात येत असून वैद्यकीय चमूकडून उंटांना टॉनिक स्वरूपात औषधांचा डोस दिला जात आहे. जेणेकरून अनेक दिवसांपासून चालत असलेल्या उंटांची अवस्था दयनीय झाली असून पुन्हा आपल्या मरुभूमीत सुस्थितीत पोहचवण्यासाठी त्यांना उपचाराच्या माध्यमातून स्थिर केले जात आहे.

मात्र, नाशिकचे वातावरण उंटांना योग्य नसल्याचे जाणवते आहे. कारण मागील चार ते पाच दिवसात आठ उंटांचा मृत्यू झाला आहे. ज्या पांजरापोळ गोशाळेत उंटांवर उपचार सुरु आहेत, या ठिकाणी गोशाळा असल्याने गोचीड, माशी इतर कीटकांचा सामना उंटांना करावा लागत आहे. त्यामुळे डॉक्टरांना देखील उपचार करणे दुरापास्त झाल्याचे चित्र आहे. त्याचबरोबर नाशिकचा पारा जरी चाळीशीजवळ असला तरीही यापेक्षा अधिक उन्हाची आवश्यकता नव्हे ते वातावरण उंटांना अपेक्षित असते. ते नाशिक शहरात मिळत नसल्याने उंटांना प्राण गमवावे लागत असल्याचे दिसून येत आहे. म्हणूनच जितक्या लवकरात लवकर शहरात दाखल झालेल्या उंटांना मरुभूमीत पोहचवणे क्रमप्राप्त असल्याचे दिसते. त्यामुळे नाशिक प्रशासन जोमाने तयारी करत असून बुधवार दि.१७ रोजी या उंटांची रवानगी राजस्थानकडे करण्यात येणार आहे.

असा होणार प्रवास

नाशिक- वणी – धरमपूर, बार्डोली, कर्जन, बडोदा, अहमदाबाद (माऊंट अबुरोड) महेताना, पालनपूर, अंबाजीमार्गे सिरोही जिल्ह्यातील कॅमल सेन्चुरीपर्यंत हे सर्व उंट तब्बल दीड महिन्यांचा पायी प्रवास पूर्ण करणार आहेत. या उंटांचा पहिला मुक्काम धरमपूरच्या श्रीमदराजचंद्र मिशन या संस्थेच्या ‘जीवमैत्रीधाम’मध्ये होईल. येथील पशुवैद्यकांकडून उंटांची पुन्हा आरोग्य तपासणी केली जाईल. त्यानंतर तेथून पुढे बार्डोलीमार्गे प्रवास सुरू होईल.

First Published on: May 16, 2023 1:19 PM
Exit mobile version