ठाकरे गटातील मराठवाड्यातील आणखी एक खासदार शिंदे गटाच्या वाटेवर

ठाकरे गटातील मराठवाड्यातील आणखी एक खासदार शिंदे गटाच्या वाटेवर

मुंबईः केंद्रीय निवडणूक आयोगानं धन्युष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव शिंदे गटाला दिल्यानं मोठा राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला आहे. असं असलं तरी उद्धव ठाकरेंनी आपल्या बाजूनं अद्यापही सहा खासदार असल्याचं सांगितलंय. परंतु केंद्रीय निवडणूक आयोगाकडे फक्त 4 खासदारांची शपथपत्र सुपूर्द करण्यात आली आहेत. त्यामुळे शपथपत्र न देणारे ते दोन खासदार कोण याचीच चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वीच मुंबई उत्तर पश्चिमचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे ठाकरेंकडे असलेलं खासदारांचं संख्याबळ कमी झालं आहे.

शिवसेना पक्षाचे लोकसभेतील 19 खासदारांपैकी 13 खासदार हे शिंदे गटाच्या बाजूनं आहेत. त्या 13 खासदारांची शपथपत्रे शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे यापूर्वीच सादर केली आहेत. शिवसेनेच्या राज्यसभेतील तिन्ही खासदारांनी शपथपत्र दिलेली असल्याचं सांगितलं जातंय. तर मग शपथपत्र न देणारे खासदार लोकसभेतीलच आहेत का?, असंही तर्कवितर्कही लढवले जात आहेत.

लोकसभेतील 6 खासदार ठाकरे गटाच्या बाजूनं असल्याचा दावा केला जातोय, परंतु लोकसभेतील केवळ चार खासदारांची शपथपत्र निवडणूक आयोगाला मिळाली आहेत. राज्यसभेतील तिन्ही खासदारांची शपथपत्र ठाकरे गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाला मिळाली आहेत. त्यामुळे 9 खासदारांचा दावा जरी ठाकरे गटानं केलेला असला तरी प्रत्यक्षात त्यांच्या बाजूनं 7 शपथपत्र दाखल झाल्याचा निवडणूक आयोगाचा निकाल सांगतो.

ठाकरे गटाकडे असलेल्या सहा खासदारांमध्ये परभणीचे संजय जाधव, ठाण्याचे राजन विचारे, मुंबई मध्यचे खासदार अरविंद सावंत, उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर, रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत तसेच महाराष्ट्राच्या बाहेरील दादरा नगर हवेलीच्या खासदार कलाबेन डेलकर यांचा समावेश आहे. आता या सहा खासदारांपैकी दोन खासदारांचं शपथपत्र केंद्रीय निवडणूक आयोगाकडे प्राप्त झालेलं नाही, त्यामुळे ते शपथपत्र न मिळालेले ते दोन खासदार कोण याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगत असली तरी ते खासदार मराठवाड्यातील असल्याची चर्चा आहे. ठाकरे गटाचे उस्मानाबादचे खासदार ओम राजे-निंबाळकर आणि परभणीचे खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव यांच्यापैकी एकाकडे संशयाची सई वळली आहे. मराठवाड्यातील या दोघांपैकी एक खासदार हा शिंदे गटात जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे नेमका कोणता खासदार शिंदे गटात जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


हेही वाचाः ठाकरे गटाच्या नेत्यांची उद्धव ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक

First Published on: February 18, 2023 1:20 PM
Exit mobile version