मतमोजणीसाठी २९ टेबल, ८७ कर्मचार्‍यांची नियुक्ती; पदवीधर मतमोजणी केंद्राची विभागीय आयुक्तांकडून पाहणी

मतमोजणीसाठी २९ टेबल, ८७ कर्मचार्‍यांची नियुक्ती; पदवीधर मतमोजणी केंद्राची विभागीय आयुक्तांकडून पाहणी

नाशिक : पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी २ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. सय्यद प्रिंप्री येथे होणारया मतमोजणी तयारीचा विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आढावा घेत केंद्राची पाहणी केली. जिल्हा निवडणूक शाखेने स्वमालकीचे गोदाम सय्यद प्रिंप्री येथे उभारले आहे. याच गोदामात नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची 2 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे.या गोदामात दोन मोठे हॉल, इव्हीएम स्ट्राँग रूम, निवडणूक निरीक्षक केबिनसह कर्मचार्‍यांसाठी प्राथमिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

मतमोजणीसाठी २८ टेबल तसेच १ टेबल पोस्टल बॅलेटच्या मतमोजणीसाठी असतील. प्रत्येक टेबलावर ३ कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. मतमोजणी केंद्रातील व्यवस्था, पोलीस बंदोबस्त, मतदान केंद्र प्रतिनिधींची व्यवस्था याबाबत आयुक्त गमे यांनी पाहणी करत आढावा घेतला. गमे यांनी मतमोजणी केंद्रावर सर्व साहित्य उत्तम दर्जाचे असावे. गुणतत्तापूर्ण कामे करण्यात यावीत. अधिकारी- कर्मचारी यांची भोजन, बैठक व्यवस्था उत्तम असावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी संबंधितांना दिल्या.

यावेळी निवडणूक निरीक्षक निपुण विनायक, जिल्हाधिकारी नाशिक तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गंगाथरण.डी., जिल्हाधिकारी अहमदनगर तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, धुळयाचे जिल्हाधिकारी जलज शर्मा, जळगावचे जिल्हाधिकारी अमन मित्तल, नंदूरबारचे जिल्हाधिकारी मनीषा खत्री, उपायुक्त (प्रशासन) रमेश काळे, उपायुक्त उन्मेष महाजन, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) स्वाती थविल, प्रांत अधिकारी तेजस चव्हाण, इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

First Published on: January 24, 2023 7:53 PM
Exit mobile version