अरविंद सावंतांची गांधीगिरी, मंगलप्रभात लोढांना दिलं इयत्ता चौथीच्या इतिहासाचं पुस्तक भेट

अरविंद सावंतांची गांधीगिरी, मंगलप्रभात लोढांना दिलं इयत्ता चौथीच्या इतिहासाचं पुस्तक भेट

मुंबई – भाजपा आमदार मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांनी प्रतापगडावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीची तुलना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या बंडाशी केली. यावरून मुंबईसह संपूर्ण राज्यभर विरोधकांनी आंदोलन केले आहे. तर, शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी मंगलप्रभात लोढा यांना इयत्ता चौथीच्या इतिहासाचं पुस्तक भेट दिलं आहे. तसंच, मंगलप्रभात लोढा राजीनामा देत नाही तोवर आम्ही शांत बसणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला आहे.

हेही वाचा – छत्रपती शिवरायांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही, मंत्री लोढा यांचा यू-टर्न

शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्या नेतृत्त्वाखाली आज मुंबईत मंगलप्रभात लोढा यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आलं. तेव्हा त्यांनी मंगलप्रभात लोढा यांना भेटून इयत्ता चौथीचं इतिहासाचं पुस्तक भेट दिलं. या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लिहिलेला आहे. ज्यांना इतिहास माहिती नाही त्यांना आम्ही इतिहास शिकवत आहोत, असं अरविंद सावंत म्हणाले.

हेही वाचा – महिलांशी गैरवर्तन करणाऱ्यांची यापुढे गय केली जाणार नाही, चित्रा वाघ यांचा इशारा

“ते निर्लज्ज आहेत. त्यांना लाज वाटत नाही की, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेण्याची भाषा केली होती आणि आता त्यांचा अपमान करत आहेत. ते शब्दच्छल करत आहेत, शब्दांचे खेळ करत आहेत. जोपर्यंत भाजपाचे नेते छत्रपतींच्या अपमानाबद्दल पश्चाताप व्यक्त करत नाहीत, तोपर्यंत उभ्या महाराष्ट्रात यापुढे भाजपाचा कुठलाही नेता फिरू शकणार नाही. त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील,” असा थेट इशाराही अरविंद सावंत यांनी दिला आहे.

नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांचा समाचार घेतल्यास आपल्याचा वाक्याचा विपर्यास केला जातोय, असं म्हटलं जातं. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतरही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी असंच म्हटलं होतं की, राज्यपालांच्या व्यक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. आता गद्दारांची तुलना शिवाजी महाराजांशी केली आहे. व्हिडिओतही ते स्पष्ट दिसतंय, असंही अरविंद सावंत म्हणाले.

First Published on: December 1, 2022 2:19 PM
Exit mobile version