आशिमा मित्तल : जिद्द, चिकाटी अन् संघर्षाची कहाणी

आशिमा मित्तल : जिद्द, चिकाटी अन् संघर्षाची कहाणी

सन 2017 मध्ये सिव्हील सर्व्हिसेसच्या परीक्षेत संपूर्ण भारतात 12 वे स्थान प्राप्त केलेल्या जिल्हा परिषदेच्या सीईओ आशिमा मित्तल यांनी ‘अपने हौसले बुलंद कर, मंज़िल तेरे बहुत करीब है, बस आगे बढ़ता जा, यह मंज़िल ही तेरा नसीब है।’ या जिद्दीने आयएस होण्याचे निश्चित केले. पहिल्या दोन प्रयत्नांत त्यांना अपेक्षीत यश आले नाही. म्हणून त्यांनी हार न मानता त्याच जिद्दीने अभ्यास सुरु केला आणि आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले.

अगर सुरज की तरहा तुम्हे चमकना है,
तो पहले हमे जलना भी होगा ।
जो चीज हमे सोने नही देती
वो हमारा पॅशन है ।
असा संदेश देणार्‍या मित्तल यांनी आयआयटी मुंबईत 2014 मध्ये सिव्हील इंजिनिअरींगची पदवी घेतली त्यांनी काही काळ एका मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून काम बघितले. पण समाजासाठी आपण देणे लागतो या भावनेतून त्यांनी ग्रामीण भागातील गरीबी आणि महिलांचे प्रश्न समजावून घेतले. यातूनच त्यांना विशेषत: गरीब लहान मुले आणि महिलांसाठी कार्य करण्याची प्रेरणा मिळाली. यासाठी नोकरी सोडून त्यांनी सिव्हील सर्व्हिसेसच्या परीक्षेची तयारी सुरु केली. 2014 ते 2017 असे तीन वर्ष त्यांनी कठोर परिश्रमाद्वारे यश प्राप्त केले. पहिल्या प्रयत्नात ऑगस्ट 2015 मध्ये त्यांनी प्रिलीयम उत्तीर्ण केली. डिसेंबर 2015 मध्ये मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मुलाखतीची वेळ आली. मार्चमध्ये मुलाखत दिली. केवळ 14 दिवसांच्या कालावधीत त्यांनी मुलाखतीची तयारी केली. मात्र वेळ कमी पडल्याने यशाने त्यांना हुलकावणी दिली. अनेकांची प्रिलीयममध्येच दांडी उडते. जे प्रिलीयम पास होतात, त्यांची मुख्य परीक्षेला गर्भगळीत अवस्था होते. जे मुख्य परीक्षा उत्तीर्ण होतात ते मुलाखतीत मार खातात. या सर्वांच्या पलीकडे, पहिल्याच प्रयत्नात मुलाखतीपर्यंत पोहोचल्याने आत्मविश्वास अधिक दृढ झाला. हार न माता पुन्हा एकदा प्रामाणिकपणे त्यांनी परीक्षेची तयारी सुरु केली.

आई वडिलांकडून मिळालेली प्रेरणा आणि उराशी बाळगलेले ध्येय यापुढे मिळालेल्या अपयशाची उंची फारच कमी असल्याने त्यांनी पुन्हा प्रयत्न सुरु केले. दुसर्‍या प्रयत्नात त्यांना 328 वी रँक मिळाली. इंडियन रेव्हेन्यु सर्व्हिसेसमध्ये त्यांची इनक्मटॅक्स डिपार्टमेंटमध्ये प्रशिक्षण सुरु झाले. मात्र आयएस होण्याची खुणगाठ मनाशी बांधलेल्या आशिमा मित्तल यांनी ध्येयाशी किंचीतही तडजोड केली नाही. ट्रेनिंगसोबत त्यांनी पुन्हा तिसरा प्रयत्न सुरु केला. दुसर्‍या आणि तिसर्‍या प्रयत्नातील काळ हा जीवनातील सर्वात खडतर काळ होता. मेडीकल प्रॉब्लेम्स, स्ट्रेस जाणवत असतांनाही अभ्यासात सातत्य ठेवले, इस्पॅरेंटो ही भाषा शिकण्याचा प्रयत्न केला. या वेळेला प्रयत्नांची पराकाष्ठा अन दोन प्रयत्नांचा अनुभव याच्या जोरावर त्यांनी तिसर्‍या प्रयत्नात संपूर्ण भारतात बारावे स्थाप प्राप्त केले.

आयएसचे ट्रेनिंग म्हसुरीला लाल बहादूर शास्त्री नॅशनल अ‍ॅकेडमी ऑफ एडमिनीस्ट्रेशन (लबासना) याठिकाणी पूर्ण केल्यानंतर पालघर जिल्ह्यात डहाणूमध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी, प्रकल्प अधिकारी म्हणून दोन वर्ष काम केले. या दोन वर्षात आश्रमशाळा, आदिवासींचे प्रश्न सोडविले. कायदा आणि सुव्यवस्थेसाठी काम केले. विकासाशी संबंधित आणि नियमीत असे दोन प्रकारे आयएस अधिकार्‍यांना काम करावे लागते. दोन पदांचे शिवधनुष्य पेलतांना संपूर्ण शक्ती पणाला लागते. वसई विरार ते डहाणू लोकल एक्सपांन्शनसाठी लॅण्ड अ‍ॅक्वेझिशन, मुंबई वडोदरा मार्ग, मुंबई दिी एक्सप्रेस वे, बुलेट ट्रेन लॅण्ड अ‍ॅक्वेझिशनसोबत सुमारे 200 प्रलंबित केसेस सोडविल्या. कोविड काळात महसुलच्या 300 केसेस सोडविल्या. आश्रमशाळांमध्ये शैक्षणिक गुणवत्तेवर काम केले. महिला बचत गट, डहाणूच्या जिल्हा रुग्णालयात आयसीयु निर्माण करण्यासाठी सीएसआर फंडातून 2 कोटींचे फंडींग उभे केले. डहाणू फेस्टिव्हल सुरु केला. डहाणु टुरिझम साठी उपक्रम सुरु केले.

प्रशासकीय काळात नाशिक जिल्हा परिषदेचा सीईओचा पदभार आशिमा मित्तल यांनी हाती घेतल्यानंतर जिल्ह्याचे विकास कार्य त्याच जोमाने सुरु केले. 1300 ग्रामपंचायत अन 2 हजार गावे एवढे मोठे कार्यक्षेत्र असलेल्या नाशिक जिल्ह्यातीले ग्रामीण रहिवाशांचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणार्‍या आशिमा मित्तल यांच्यासमोर समस्यांचे डोंगर उभे आहेत. मात्र ध्येय निश्चित असल्याने न डगमगता त्या आपल्या कार्याचा ठसा उमटवित आहे. सॉलिड, लिक्वीड वेस्ट मॅनेजमेंट, सांडपाणी, अंगणवाडी सेविकांचे प्रश्न, बालमृत्यू, कुपोषण, बालविवाह, गरिबी, स्थलांतर हे प्रश्न सोडवितांना समस्यांशी संबंधित विभागाद्वारे प्रत्येक समस्येला सोडविण्यासाठी प्रयत्नरत असतात. त्याचबरोबर समस्या सोडवितांना रोल मॉडेल तयार केले. 3265 शाळांपैकी 100 शाळा मॉडेल स्कूल म्हणून विकसित करण्यावर भर देण्यात येत आहे. पावसाच्या पाण्याचे संधारण करण्यासाठी मिशन भगिरथ, आरोग्याचे प्रश्न सोडविण्यासाठी बायोमेट्रीक पध्दत. अशा पध्दतीने मुख्य समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील दहावीच्या विद्यार्थ्यांमधील टेलेंट हेरुन आयआयटीमध्ये, मेडीकल कॉलेजमध्ये जाण्यासाठी अकरावी, बारावी या दोन वर्षाच्या काळात योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे असते.

यातूनच जन्म झाला तो सुपर-50 चा. सुपर-50 द्वारे मेडीकल प्रवेशासाठी नीट आणि इंजिनिअरींग प्रवेशासाठी जेईई मेन्स देण्यासाठी विद्यार्थ्यांची तयारी करुन घेण्यात येत आहे. पुढील काळात सुपर-50 ची व्याप्ती वाढणार आहे. एक मुलगा आयआयटीला गेल्यास पुर्ण गाव प्रेरित होते हेच या उपक्रमाचे यश आहे. याचबरोबर मॉडेल स्कुलसाठी 126 शाळांची निवड करण्यात आली असून इंग्रजी शाळांसोबत स्पर्धा करण्यासाठी त्यांची तयारी सुरु आहे.

महिलांना मोलाचा सा देतांना आशिमा मित्तल सांगतात की, पुरुष प्रधान संस्कृती महिलांचे महत्व अनन्यसाधारण आहे. महिला कुठल्याही समस्येचा सामना समर्थपणे करु शकतात. महिला आहे म्हणून घाबरण्याचे कारण नाही. समस्या असल्यास यंत्रणांचा वापर करायला हवा. आयएस पदावर काम करतांना कार्यक्षेत्रातील महिलांचे प्रश्न, मुलींचे प्रश्न अनेकवेळा भावनिक करतात. अशावेळेला योग्य निर्णय घेणे फार आवश्यक असते. यासाठी धोरण तयार करणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील महिला केवळ पाण्यासाठी अनेक किलोमीटर चालतात हे फारच दु:खदायक आहे. डहाणूमध्ये काम करतांना एका नामाकीत आश्रमशाळेतील मुलीच्या वडिलांनी गार्‍हाणे मांडले. मुलगी फोनवर रडत असल्याने एक तासात कमिटी आश्रमशाळेवर पाठविली. महिला अधिक्षक मुलीचा लैंगिक छळ करीत होती. मुलीला कठीण प्रसंगातून सोडविले. मुलीला भेटून तिला धीर दिला. या एका घटनेने मला हादरवून टाकले. निवासी शाळेत शिकणार्‍या मुलींसाठी आम्ही अधिकारीच पालक आहोत. अशा घटना घडू नये यासाठी सर्वांनी मिळून कार्य करायला हवे. अजून बरेच कार्य करायचे आहे. दरिया बहुत दूर है । लेकीन बाजुओ में भी बहोत दम है । हे सांगायला त्या विसरत नाही.

First Published on: March 8, 2023 1:08 PM
Exit mobile version