मतं फोडण्याचं काम भाजपचं, सत्यजित तांबेंच्या बंडखोरीवर अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया

मतं फोडण्याचं काम भाजपचं, सत्यजित तांबेंच्या बंडखोरीवर अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि भाजपकडून आपले उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. परंतु नाशिक पदवीधर मतदारसंघ हा महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी असून काँग्रेस नेते सुधीर तांबे आणि सत्यजित तांबे यांच्यावर काँग्रेसने निलंबनाची कारवाई केली आहे. सत्यजित तांबेंच्या उमेदवारीबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाणा आलं आहे. हा वाद सुरू असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी सत्यजित तांबे यांच्या बंडखोरीवर प्रतिक्रिया दिली आहे.

नेत्यांमध्ये वाद विवाद नसतात. त्यांच्या काही अपेक्षा असतात. ते पदासाठी इच्छुक असतात. कुणाला पक्षाकडून तिकिट मिळावं, असं वाटत असतं. तर कुणाला अपक्ष निवडणूक लढवायची असते. असे प्रश्न सामजस्यांने सोडवायचे असतात, असं अशोक चव्हाण म्हणाले.

विधान परिषद निवडणुकीतही मतं फोडण्याचं काम भाजपानेच केलं आहे. हे काही लपून राहिलं नाही. माणसं फोडून मतं मिळवायची, ही भाजपाची निवडणुकीची रणनीती असते. असाच प्रयोग मागच्या विधान परिषद निवडणुकीत झाला. नाशिकमध्येही तोच प्रयोग भाजपाच्या वतीने काही प्रमाणात झाला आहे, असं चव्हाण म्हणाले.

संबंधित जागा जिंकायची असेल तर परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा लागतो. तिन्ही पक्षाकडून एकत्र प्रयत्न झाले तर संबंधित जागा जिंकणं सोपं असतं, असंही चव्हाण म्हणाले.

शिक्षक भारती संघटनेचे आमदार कपिल पाटील यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. सत्यजित तांबे, त्यांचे वडील सुधीर तांबे आणि कपिल पाटील यांच्यात महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीनंतर कपिल पाटील यांनी सत्यजित तांबे यांना पाठिंबा जाहीर केला असून सुधीर तांबे यांनी आभार मानले आहेत.


हेही वाचा : भाजपला जागा तर निवडून आणायचीय… सत्यजित तांबेंच्या पाठिंब्यावर महाजनांची प्रतिक्रिया


 

First Published on: January 18, 2023 6:02 PM
Exit mobile version