असं बोलताना मुख्यमंत्र्यांना लाज कशी वाटत नाही? – अशोक चव्हाण

असं बोलताना मुख्यमंत्र्यांना लाज कशी वाटत नाही? – अशोक चव्हाण

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण

जैश-ए-मोहम्मदचा कुख्यात दहशतवादी मसूद अजहरला सरकारी विमानाने सोडणाऱ्या आणि पठाणकोटमध्ये पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयच्या अधिकाऱ्यांचे पायघड्या घालून स्वागत करणाऱ्या भाजपला, काँग्रेसचा जाहीरनामा पाकिस्तानी आहे, असे म्हणताना लाज कशी वाटत नाही? असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केला आहे.

नेमकं काय म्हणाले अशोक चव्हाण?

पुण्याच्या प्रचार सभेत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसचा जाहीरनामा आहे का जैश ए मोहम्मदचे घोषणापत्र? असा सवाल उपस्थित केला होता. त्याच प्रश्वारवर अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांचा समाचार घेतला आहे. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने भारतात अनेक हिंसक कारवाया घडवून शेकडो निरपराध लोकांचे बळी घेतले. पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला करुन ४० जवानांची हत्या केली, त्या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरची डिसेंबर १९९९ मध्ये भाजपच्या अटलबिहारी वाजपेयी सरकारनेच सुटका केली होती. त्याचे फडणवीस यांना सोयीस्कर विस्मरण झाले, असे टोला चव्हाण यांनी लगावला. ‘गेल्या पाच वर्षात काही काम केले नाही. त्यामुळे प्रचारसभेमध्ये सांगण्यासारखे भाजपकडे काहीच नसल्याने पाकिस्तानचा जप करण्यावर आणि धर्माच्या नावावर मतं मागण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली आहे. विकासाचा फुगा फुटल्यामुळे जनतेच्या दरबारात त्यांना तोंड दाखवायला जागा राहिलेली नाही, म्हणूनच कशाचाही संबंध कशाशीही लावण्याचा भाजप नेत्यांचा आटापिटा सुरु आहे, पण जनता सुज्ञ असून भाजपला पराभूत करून त्यांची जागा दाखवून देईल’, असे अशोक चव्हाण म्हणाले.

First Published on: April 11, 2019 8:55 PM
Exit mobile version