विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी

देशांतर्गत इतर मागासवर्गीयांचा विषय अधांतरी असतानाच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा करत निवडणूक आयोगाने सर्वच राजकीय पक्षांपुढे पेच निर्माण केला आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणीपूर, गोवा या राज्यांमध्ये सात टप्प्यांत निवडणुका होणार आहेत. १४ जानेवारीपासून पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात होत आहे. तर मतमोजणी १० मार्चला होणार आहे. या पाचही राज्यांमध्ये आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

कोरोनाच्या काळात निवडणूक घेणे हे आव्हानात्मक आहे. मात्र, निवडणूक घेणे हे आमचे कर्तव्य आहे. ‘यकीन हो तो कोई भी रास्ता निकलता है, हवा की ओट लेकर भी चिराग जलता है’ अशी शायरी करत केंद्रीय निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी या निवडणुकांची घोषणा केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणार्‍या निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाने निर्बंध लागू केले आहेत. रोडशो, पदयात्रा, प्रचार सभा, सायकल रॅलीला प्रचारात बंदी असणार आहे.

यातील उत्तर प्रदेशमध्ये सात टप्प्यांत निवडणूक पार पडणार आहे. तर मणीपूरमध्ये दोन, पंजाब, उत्तराखंड आणि गोवा या राज्यात एका टप्प्यात निवडणुका होणार आहेत. पाच राज्यांमध्ये ६९० जागांसाठी कोरोनाचे नियमांचे पालन करत ही निवडणूक प्रक्रिया पार पडेल, असे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले. या निवडणुकीत १८.३४ कोटी मतदार मतदानात आपला सहभाग नोंदवतील, असे मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले.

मतदान घेण्यासाठी अधिकारी, कर्मचार्‍यांचे लसीचे दोन डोस देऊन लसीकरण पूर्ण केलेले असावेत असे आयोगाने स्पष्ट केले आहे. या कर्मचारी आणि अधिकारी वर्गाला फ्रंटलाईन वर्कर म्हणून गणले जाईल. तसेच निवडणूक काळात काम करणार्‍या कर्मचार्‍यांना बुस्टर डोसही देण्यात येणार आहे. तर मतदान केंद्रावर सॅनिटायझेशन आणि मास्कची सोयही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

पाच राज्यांचे वेळापत्रक

उत्तर प्रदेश – सात टप्पे
पहिला टप्पा – १० फेब्रुवारी
दुसरा टप्पा – १४ फेब्रुवारी
तिसरा टप्पा – २० फेब्रुवारी
चौथा टप्पा – २३ फेब्रुवारी
पाचवा टप्पा – २७ फेब्रुवारी
सहावा टप्पा – ३ मार्च
सातवा टप्पा – ८ मार्च

मणीपूर – दोन टप्पे
पहिला टप्पा – २७ फेब्रुवारी
दुसरा टप्पा – ३ मार्च
पंजाब, उत्तराखंड, गोवा – एक टप्पा
अर्ज भरण्याची तारीख – २८ जानेवारी
अर्ज मागे घेण्याची तारीख – ३१ जानेवारी
मतदानाचा दिवस – १४ फेब्रुवारी

निकालाचा दिवस १० मार्च

महत्वाचे

– १५ जानेवारीपर्यंत जाहीर सभांना मनाई. व्हर्च्युअल प्रचारावर भर देण्याची सूचना

– रोड शो, पदयात्रा, सायकल यात्रा यासाठी पूर्णपणे मनाई असेल

– घरोघरी प्रचार करण्यासाठी केवळ पाच जणांनाच परवानगी असेल

– उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध

– सुविधा अ‍ॅपच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज दाखल करता येईल

– कोविडमुळे पाचही राज्यांत मतदानाची वेळ एक तासाने वाढवली

– मतदारांना पैशांचे तसेच अन्य आमिष दाखवण्याचा प्रयत्न झाल्यास कठोर कारवाई

– प्रत्येक बूथवर मास्क, सॅनिटायझरची व्यवस्था

-know your candidate अ‍ॅप सुरू करणार.

– गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना गुन्ह्यांचा तपशील जाहीर करणे बंधनकारक

– राजकीय पक्षांनाही उमेदवाराचे गुन्हेगारी रेकॉर्ड जाहीर करणे अनिवार्य

-१६२० मतदान केंद्रांवर संपूर्ण प्रक्रिया महिला कर्मचारी पार पाडणार

– सर्व मतदान केंद्रे तळमजल्यावर राहतील अशी व्यवस्था करण्यात येणार

First Published on: January 9, 2022 5:50 AM
Exit mobile version