दसरा मेळाव्यातील भाषणात भारताचा अपमान, मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

दसरा मेळाव्यातील भाषणात भारताचा अपमान, मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्रीपदाचा मास्क बाजुला सारून जोरदार राजकीय भाषण केले. मी आतापर्यंत शांत होतो, पण आज मी माझ्या शिवसैनिकांसाठी भाषण करणार असल्याचे सांगत उद्धव ठाकरेंनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. मात्र या मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर औरंगाबाद येथील वकील रत्नाकर चौरे यांनी आक्षेप घेतला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात भारताचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीही चौरे यांनी केली आहे.

कोरोनाच्या संक्रमणामुळे सध्या जाहीर कार्यक्रम घेण्यात अटकाव करण्यात आलेला आहे. त्यामुळे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर आलेला पहिलाच दसरा मेळावा हा बंद सभागृहात काही मोजक्या नेत्यांच्या उपस्थितीत पार पडला. या मेळाव्यात बोलत असताना ठाकरेंनी केंद्र सरकार, राज्यातील विरोधक आणि कंगना राणावत यांच्यावर टिकेची झोड उठवली. मात्र केंद्र सरकारवर टीका करत असताना ठाकरेंनी वापरलेल्या एका वाक्याचा उल्लेख करत चौरे यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

हे वाचा – अर्थव्यवस्थेकडे लक्ष द्या, अन्यथा अराजकता माजेल; उद्धव ठाकरेंचा मोदींना इशारा

मुख्यमंत्री ठाकरेंनी भारताची तुलना पाकिस्तान आणि बांगलादेश सारख्या दहशतवादी मुस्लिम राष्ट्राशी करुन आपल्या देशाचा अपमान केला असल्याचे चौरे यांचे म्हणणे आहे. तसेच ठाकरे यांनी हिंदुत्वाचा त्याग करुन राज्याची सत्ता हस्तगत केल्यामुळे राष्ट्रीय आणि धार्मिक भावना दुखावल्याचेही चौरे म्हणाले आहेत. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांवर फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रारीद्वारे केली आहे.

 

First Published on: October 27, 2020 9:19 PM
Exit mobile version