औरंगाबाद-पुणे लवकरच ‘एक्सप्रेस वे’

औरंगाबाद-पुणे लवकरच ‘एक्सप्रेस वे’

नाशिक-मुंबई सहापदरीकरणापाठोपाठ आता औरंगाबाद-पुणे मार्गदेखील लवकरच ‘एक्स्प्रेस वे’ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या प्रकल्पाचा प्राथमिक आराखडा तयार केला असून, त्याचं सोमवारी केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सादरीकरण झालं.

औरंगाबाद-पुणे एक्स्प्रेसवे दोन्ही शहरांतील उद्योगवाढीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. तसेच, प्रवासाचा वेळ आणि इंधन खर्चातही मोठी बचत होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा मार्ग विस्तारीत करण्याची मागणी केली जातेय. मात्र, आता हा प्रकल्प साकारण्यासाठी हालचाली सुरू झाल्यानं सर्वच घटकांना प्रत्यक्ष कामाची उत्सुकता लागलीय. सध्याच्या घडीला औरंगाबादकरांना पुणे गाठण्यासाठी तब्बल ६ तास लागतात. मात्र, हाच वेळ एक्स्प्रेस वेनंतर निम्म्यावर येऊ शकेल. केंद्र सरकारच्या ग्रीनफिल्ड योजनेत पुणे-औरंगाबाद मार्गाचा समावेश आहे. त्यामुळे सध्याचा मार्ग वगळून ग्रीनफिल्ड मार्ग तयार केला जाणार आहे. त्यासाठीच्या भूसंपादनाबाबतही ऑनलाईन बैठकीत चर्चा झाली.

औरंगाबाद-पैठण मार्गाचे चौपदरीकरण

औरंगाबाद-पैठण चौपदरीकरणाचा मार्गदेखील मोकळा झाला आहे. हे काम लवकच सुरू होणार असल्याचा शब्द गडकरींनी दिलाय. या मार्गासाठी १ हजार ९०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या मार्गावर तीन बायपास आणि तीन उड्डाणपूलांचा अंतर्भाव आहे. भूसंपादनासाठी ९०० कोटी, तर रस्त्यासाठी १ हजार कोटींची तरतूद केली जाणार आहे. दोन महिन्यांत प्रत्यक्ष भूसंपादनाला सुरुवात होण्याची शक्यता महामार्ग प्राधिकरणाच्या सूत्रांनी वर्तवलीय.

First Published on: October 12, 2021 8:01 PM
Exit mobile version