महादेवाचे दर्शन घेण्याआधी दोन बहिणी नदीवर स्नान करायला गेल्या, त्या परतल्याच नाहीत

महादेवाचे दर्शन घेण्याआधी दोन बहिणी नदीवर स्नान करायला गेल्या, त्या परतल्याच नाहीत

कन्नड तालुक्यातील खामगाव येथील खोलीकरण झालेल्या खारी नदी पात्रात दोन बहिणींचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज, सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या दोन बहिणी अधिक मासात महादेव मंदिरात दर्शनासाठी जाण्याआधी नदीवर स्नान करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, खामगाव पंचक्रोशीत या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आरती कैलास कवडे (२२) आणि ऋतुजा शिवाजी कवडे (१८) अशी मृत्यू झालेल्या या सख्ख्या चुलत बहिणींची नावे आहेत.

नेमके काय घडले?

खामगाव येथील खोलीकरण झालेल्या खारी नदी पात्रात अधिक मासानिमित्त गावातील महिला सकाळी महादेव मंदिरात देव दर्शनासाठी आणि नदी पात्रात स्नान करण्यासाठी गेल्या होत्या. या महिलांसोबत आरती आणि ऋतुजा या दोघी बहिणी देखील गेल्या होत्या. त्यावेळी एका मुलीचा पाय घसरुन ती खाली पडली. ते पाहून तिला वाचवण्यासाठी दुसरीने धाव घेतली असता तिही त्या नदी पात्रात बुडाली. या घटना गावात समजल्यानंतर ग्रामस्थांनी आणि कुटुंबीयांनी नदी पात्राजवळ धाव घेतली. मात्र, त्या दोघींना वाचवण्यात यश आले नाही. अखेर ग्रामस्थांच्या मदतीने दोघींचेही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले आणि औराळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप कांबळे आणि डॉ. शरयु चव्हाण यांनी मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून ते नातेवाईकांच्या ताब्यात दिले.


हेही वाचा – १५ ऑक्टोबरपासून ‘या’ मार्गावर धावणार विशेष ट्रेन; असं असणार वेळापत्रक


 

First Published on: October 13, 2020 7:00 PM
Exit mobile version