साधू हत्याकांडातील १४ जणांना जामीन

साधू हत्याकांडातील १४ जणांना जामीन

गेल्यावर्षी कोरोना लॉकडाऊन काळात घडलेल्या बहुचर्चित डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथील दोन साधूंसह तीन जणांच्या हत्याकांडप्रकरणी अटकेत असलेल्या १४ जणांचा जामीन अर्ज न्यायालयाने मंजूर केला असून अन्य १८ आरोपींचे जामीन अर्ज ठाणे अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळून लावले आहेत. याप्रकरणाची पुढील सुनावणी ३० जुलै रोजी होणार आहे.
पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोर समजून जमावाने १६ एप्रिल २०२० रोजी कल्पवृक्ष गिरी (७०), सुशीलगिरी महाराज (३५) या दोन साधूंसह गाडी चालक निलेश तेलगडे (३०) यांना बेदम मारहाण करून त्यांची निर्घृण हत्या केली होती.
या हत्याप्रकरणी आतापर्यंत २०० पेक्षा जास्त आरोपींना अटक करण्यात आली असून त्यापैकी ७५ जणांना मुख्य आरोपी करण्यात आले आहे. मंगळवारी जामीन अर्जावर सुनावणी झाली. त्यावेळी १४ जणांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. तर अन्य १८ आरोपींचे जामीन अर्ज नामंजूर केले आहेत. याप्रकरणाची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश आर. एस. गुप्ता यांच्यासमोर झाली. या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या ३० जुलै रोजी होणार आहे. यापूर्वीही अटकेतील काही आरोपींना न्यायालयाने जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता. या साधू हत्याकांडाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले होते. हत्याकांडाचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटले होते. याप्रकरणी भाजपने अनेकदा सीबीआय चौकशीची मागणी केली होती. देशाच्या विविध स्तरावरून या निर्घृण हत्याकांडाचा तीव्र निषेध करण्यात आला होता. मात्र, या प्रकरणाचा तपास राज्य सरकारच्या तपास यंत्रणा करत आहेत.

First Published on: June 30, 2021 11:25 PM
Exit mobile version