बाळासाहेबांच्या पुर्णाकृती पुतळ्याची जागा बदलली

बाळासाहेबांच्या पुर्णाकृती पुतळ्याची जागा बदलली

पुर्णाकृती पुतळ्याची जागा

शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा पुर्णाकृती पुतळा दक्षिण मुंबईतील रिगल सिनेमा आणि राज्य पोलीस महासंचालक इमारतीसमोरील चौकामध्ये बसवण्यास सर्व प्रकारच्या परवानगी मिळालेल्या असतानाच आता या पुतळ्याची जागाच बदलण्याची मागणी शिवसेनेकडून होत आहे. बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा महात्मा गांधी रोड, डॉ. शामाप्रसाद मुखर्जी चौकातील वाहतूक बेटामध्ये बसवण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. शिवसेनेच्या या मागणीमुळे आता नव्याने परवानगी घेण्याची वेळ महापालिकेवर येणार आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर तत्कालिन स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी बाळासाहेबांचा पुर्णाकृती पुतळा दक्षिण मुंबईतील रिगल सिनेमासमोरील वाहतूक बेटावर बसवण्यात यावा, अशी मागणी केली होती. त्यानुसार गटनेत्यांच्या सभेत व त्यानंतर महापालिकेच्या सभेत मंजुरी घेण्यात आला होता. महापालिकेच्या ए विभागाच्यावतीने वाहतूक पोलिसांसह पुरातन वास्तू तसेच अन्य सर्व प्रकारच्या परवानगी प्राप्त केल्या होत्या.

मात्र, शिवसेनेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी हा पुतळा आता दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय आणि नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्टस या इमारतीसमोर महात्मा गांधी रोड, डॉ.शामाप्रसाद मुखर्जी चौकातील वाहतूक बेटामध्ये बसवण्याची मागणी केली आहे. शिवसेनाप्रमुखांचा पुर्णाकृती पुतळा बनवण्याचे काम जोगेश्वरी येथील मातोश्री क्रिडा संकुलात सुरु आहे. हे काम जवळपास पूर्ण झाले आहे.

महापालिकेच्या ‘ए’ विभागाच्या सहायक आयुक्त चंदा जाधव यांच्याशी संपर्क साधला असता, बाळासाहेबांच्या पुर्णाकृती पुतळ्याची जागा ही राज्य पोलीस महासंचालक मुख्यालय इमारतीसमोरील वाहतूक बेटाच्याठिकाणी निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार हा पुतळा बसवण्यासाठीच्या सर्व प्रकारच्या परवानगी प्राप्त झालेल्या आहेत. परंतु आता ही जागा बदलण्यासंदर्भात विचार सुरु आहे. पुतळ्याची जागा बदलल्यास पुन्हा नव्याने सर्व प्रकारच्या परवानगी घ्याव्या लागतील,असे त्यांनी स्पष्ट केले.

पोलीस महासंचालक मुख्यालयासमोरील वाहतूक बेट हे छोटे आहे. त्यामुळे कमी आणि अडगळीच्या जागेत बाळासाहेबांचा पुतळा बसवणे योग्य ठरणार नाही. त्याऐवजी नवी जागा सोयीची असून तिथे पुतळा उभारल्यास याठिकाणी येणार्‍यांना तिथे उभे राहता येवू शकते. त्यामुळेच ही जागा निवडली आहे.
-यशवंत जाधव, स्थायी समिती अध्यक्ष

First Published on: December 12, 2019 7:12 AM
Exit mobile version