विरोधक माझी बदनामी करतायत – धनंजय मुंडे

विरोधक माझी बदनामी करतायत – धनंजय मुंडे

विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे

बीड जिल्हा बँक कर्ज घोटाळ्यामध्ये नाव समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर चहुबाजूंनी टीका होऊ लागली आहे. त्यांच्या राजकीय विरोधकांना तर यामुळे आयतंच कोलीत मिळालं आहे. या सर्व प्रकारामुळे धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत सापडले होते. मात्र, मुंडे यांनी लागलीच प्रसिद्धी पत्रक काढून आपल्यावरील आरोपांचं खंडन करत विरोधक टीका करताना तांत्रिक चूक करत असल्याचं या परिपत्रकात त्यांनी म्हटलं आहे. न्यायालयाच्या निर्णयाचा चुकीचा अर्थ लावून आपली बदनामी केली जात असल्याचं धनंजय मुंडे यांनी या पत्रकात म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण?

बीडमधल्या संत जगमित्र सूतगिरणी पतसंस्थेचे धनंजय मुंडे हे एक संचालक आहेत. त्यांच्याशिवाय या सूत गिरणीचे अजून १७ संचालक आहेत. या संस्थेने बीड जिल्हा बँकेकडून तीन कोटींचे कर्ज घेतले. मात्र, हे कर्ज घेताना गैरव्यवहार झाल्याचा दावा करणारी याचिका आंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल झाली. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान जिल्हा सत्र न्यायालयाने धनंजय मुंडे यांच्यासह प्रकरणाशी संबंधित इतर आठ जणांच्या मालमत्तांविषयी बुधवारी आदेश दिले. यामध्ये या सर्वांच्या मालमत्ता व्यवहारांवर न्यायालयाने निर्बंध लादले. या मालमत्तांची कुठेही गहाण खत किंवा बोजा चढवण्यावर न्यायालयाने बंदी घातली. या निर्णयामुळे धनंजय मुंडे यांचे घर, सूत गिरणीचे कार्यालय आणि इतर ठिकाणी असलेल्या मालमत्ता न्यायालयाच्या निर्णयात अडकल्या.


हेही वाचा – बीड जिल्हा सहकारी बँक घोटाळा; धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ


मालमत्ता जप्त केल्याच्या मुद्द्याचा वापर

दरम्यान, विरोधकांनी न्यायालयाच्या निर्णयाचा चुकीचा अर्थ लावून आपल्या मालमत्तेच्या जप्तीचे आदेश न्यायालयाने दिल्याचा दावा करत आपली बदनामी सुरू केल्याची भूमिका धनंजय मुंडेंनी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात केला आहे. आंबाजोगाई न्यायालयाने मालमत्ता जप्त करण्यासंदर्भात निकालात कुठेही काहीही म्हटलेले नसून व्यवहारांवर बंदी घातली आहे अशे या पत्रकात म्हटले आहे. तसेच, न्यायालयाचा हा निकाल अंतिम नसून अंतरिम आहे. त्यामुळे त्यासंदर्भातली नोटीस प्राप्त होताच न्यायालयात हजर राहून आम्ही आदेश रद्द करण्यासाठी न्यायालयीन लढा देऊ, असेही मुंडे यांनी म्हटले आहे.

कर्ज बुडवणारे भाजपवालेच!

डी. सी. सी. बँक ज्यांनी बुडवली आणि चार वर्ष कारावासही भोगला ते महारथी भाजपाचेच कार्यकर्ते, नेते आहेत, आणि आजही ते पालकमंत्र्यांसोबत जाहीर कार्यक्रमात व्यासपीठावर बसतात. हे संपुर्ण जिल्ह्याला माहित असताना न्यायालयीन निकालाचा चुकीचा अर्थ लावून आपली बदनामी करणार्‍यांचा हा प्रकार म्हणजे ‘उलटा चोर कोतवाल को डाटे ‘ असा असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.


तुम्ही हे वाचलंत का? – पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना ‘धस’का दम!

First Published on: September 13, 2018 8:45 PM
Exit mobile version