भंडारदरा धरण शंभर टक्के भरले

भंडारदरा धरण शंभर टक्के भरले

अकोले : पर्यटन पंढरी म्हणून ओळखले जाणारे भंडारदरा धरण (दि.16) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पूर्ण क्षमतेने भरले. सध्या धरणाच्या सांडव्याद्वारे 9 हजार 72 क्युसेक, व्हॉल्वद्वारे 329 क्युसेक व विद्युत गृहाद्वारे 818 क्युसेक असा एकूण 10 हजार 219 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आला आहे. भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने लाभक्षेत्रात आनंदाचे भरते आले आहे. पावसामुळे पाणलोट क्षेत्राला सौंदर्य प्राप्त झाले असून, गेल्या तीन दिवसांत भंडारदरा परिसरात 50 हजारांहून अधिक पर्यटकांनी भेट दिली आहे. सलग सुट्यांच्या पार्श्वभूमीवर राजूरचे सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली राजूर पोलिसांनी केलेल्या योग्य नियोजनामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी होवूनही या कालावधीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही.

पावसाने भंडारदरा व निळवंडे ही दोन्ही धरणे भरण्याची स्थितीही निर्माण केली होती. मात्र, मुसळधार पाऊस सुरु असताना धरणांचे पाणीसाठे पूर्ण क्षमतेकडे नेल्यास त्यातून धरणासह लाभक्षेत्राच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाल्याने धरण व्यवस्थापनाने परिचलन सूचीचा प्रभावी वापर केला. त्यामुळे अनियमितपणे कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाल्यानंतर प्रवरा नदीपात्रातून 14 हजार क्यूसेकपर्यंत पाणी वाहूनही कोठूनही पुराच्या पाण्याने नुकसान झाले नाही. गेल्या आठवड्यापासून भंडारदर्‍याचा पाणीसाठा तांत्रिक पातळीवर 95 टक्के तर निळवंड्याचा पाणीसाठा 85 ते 90 टक्क्यांवर पोहोचला. पावसाचा जोर निम्म्याहून अधिक कमी झाल्याने धरण व्यवस्थापनाने भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेने भरण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सोमवारी (दि.१६) सकाळी 6 वाजता गेल्या 24 तासांत धरणांत दाखल झालेल्या 713 दशलक्ष घनफूट पाण्यातील 255 दशलक्ष घनफूट पाणी रोखून भंडारदर्‍याचा एकूण पाणीसाठा 98.82 टक्क्यांवर नेण्यात आला. तर दुपारी 12 वाजेपर्यंतच्या सहा तासांतच धरणात 130 दशलक्ष घनफूट पाणी दाखल झाल्याने भंडारदर्‍याची पाणीपातळी 215.70 फूटांवर नेवून धरण पूर्ण भरल्याची घोषणा शाखा अभियंता अभिजीत देशमुख यांनी केली.

निळवंडे धरणाचा पाणीसाठा मात्र अद्यापही 85 ते 90 टक्क्यांवर ठेवण्यात आला असून, मागील 24 तासांत धरणात दाखल झालेल्या 713 दशलक्ष घनफूट पाण्यासह धरणाच्या साठ्यातील 32 दशलक्ष घनफूट अशा एकूण 745 दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर करण्यात आला आहे. सध्या धरणातून 16 हजार 718 क्यूसेक वेगाने प्रवरा नदीपात्रात पाणी सोडले जात आहे. प्रवरा नदी दुथडी भरुन वाहत आहे. त्यातच आता भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेने भरण्यात आल्याने पुढील कालावधीत प्रवरा नदीला पूर येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

पर्यटक ऑगस्ट महिन्यात भंडारदरा परिसरात मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात. तीन दिवसांत ५० हजारांहून अधिक पर्यटकांनी या भागाला भेट दिली. गर्दीच्या पार्श्वभूमीवर आम्ही भंडारदर्‍याकडे जाणार्‍या आणि येणार्‍या रस्त्यांवर एकेरी वाहतुकीसह ठिकठिकाणी तपासणी नाके तयार करुन प्रत्येक पर्यटकाच्या वाहनाची तपासणी करण्यात आली. काही पर्यटकांनी सोबत आणलेल्या मद्याच्या बाटल्या जप्त करुन त्यांच्या समोरच त्या ओतून देण्यात आल्या. परिणामी, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. या कालावधीत ६० हजारांहून अधिक रुपयांच्या मद्याची विल्हेवाटही लावली. : नरेंद्र साबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, राजूर

First Published on: August 17, 2022 2:09 PM
Exit mobile version