निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारिप – एमआयएम युती

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारिप – एमआयएम युती

ओवेसी आणि प्रकाश आंबेडकर

लोकसभा निवडणूक २०१९ साठी देशात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पक्षांमधील खलबतींना उधाण आले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील दोन महत्त्वाच्या पक्षांनी एकमेकांसोबत हातमिळवणी केली आहे. असदुद्दीन ओवेसी यांचा एमआयएम आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघाने युती केली आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत हे दोनही पक्ष एकत्र लढणार आहेत. एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी याबाबतची घोषणार केली असून २ ऑक्टोबर रोजी, महात्मा गांधींच्या जयंतीच्या निमित्ताने औरंगाबाद येथे जबिंदा लॉन्सवर युतीची पहिली एकत्रित सभा होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

पक्ष प्रमुखांची बैठक होणार 

ऑाल इंडिया मजलिश-ए-इत्तेहादूल मुस्लिमीन (एमआयएम) पक्ष आणि भारतीय रिपब्लिकन पार्टी बहुजन महासंघ (भारिप) या दोनही पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात २ ऑक्टोबरला सकाळी बैठक पार पडणार आहे. यापूर्वी प्रकाश आंबेडकर यांच्या पुण्यातील निवासस्थानी दोन्ही पक्षांच्या युतीबाबत बैठका झाल्या होत्या. भारिपचे प्रकाश आंबेडकर या युतीचे नेतृत्व करणार असल्याचे सांगितले जात आहे. या युतीच्या माध्यमातून राज्यातील दलित आणि मुस्लिम मतदारांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. या युतीमुळे काँग्रेस पक्षाला मोठा फटका बसू शकतो, असे बोलले जात आहे.

अहमदनगर पालिका निवडणुकीचे सुरूवात

राज्यातील महानगरपालिका, लोकसभा आणि विधान सभा या सर्वच निवडणुका भारिप – एमआयएम एकत्रितपणे लढवणार आहेत. अहमदनगरच्या पालिका निवडणुकीत ही युती पहिल्यांदा त्यांचे नशीब आजमावणार आहे. राज्यात भाजप – शिवसेना आणि काँग्रेस – एनसीपी या चार महत्त्वाच्या पक्षांची युती राजकीय वर्तुळात कायम चर्चेत राहिली आहे. ऐन निवडणुकांच्या तोंडावर हे पक्ष एकमेकांसोबतची युती तोडतात आणि पक्ष स्थापनेसाठी पुन्हा एकत्र येतात, हा इतिहास आहे. त्यामुळे आता भारिप आणि एमआयएमची युती कोणत्या निषकांवर टिकून राहिली हे पाहावे लागणार आहे.

First Published on: September 15, 2018 3:45 PM
Exit mobile version