भुजबळांनी केला रेमडेसिवीर वाटपाचा पर्दाफाश

भुजबळांनी केला रेमडेसिवीर वाटपाचा पर्दाफाश

नाशिकमध्ये रेमडेसिवीरसाठी रूग्णांच्या नातेवाईकांना वणवण भटकंती करावी लागत असतांना हे इंजेक्शन वाटपाची जबाबदारी असलेल्या अन्न व औषध प्रशासनाकडून मात्र काही रूग्णालयांना आवश्यकतेपेक्षा अधिक रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा केला जात असल्याचा पर्दाफाश जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. हा प्रकार समोर आणताच यंत्रणा खडबडून जागी झाली. याप्रकरणी भुजबळांनी तातडीने संबधित विभागाच्या राज्य सचिवांशी चर्चा करून यावर नियंत्रण आणण्याचे आदेश दिले. जिल्हाधिकार्‍यांनी याप्रकरणी औषध कंपनी आणि नाशिकमधील नामांकित रूग्णालयाला नोटीस बजावत आपल्याकडील साठा जमा करण्याची नोटीस बजावल्याचे समजते.

कोरोना रूग्णसंख्या वाढीमुळे नाशिक हॉटस्पॉट ठरत आहे. रूग्णांना उपचारासाठी रूग्णालयांत बेड शिल्लक नाही. ऑक्सिजन आणि कोरोना रूग्णांना दिल्या जाणार्‍या रेमडेसिवीरचा निर्माण झालेला तुटवडा यामुळे रूग्णांची आणि रूग्णांच्या नातेवाईकांची चांगलीच हेळसांड होत आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन मिळविण्यासाठी तर मेडीकल बाहेर रूग्णांच्या नातेवाईकांच्या अक्षरशः रांगा बघायला मिळाल्या. मात्र भुजबळांनी आदेश दिल्यानंतर रेमडेसिवीर आता औषध दुकानांमध्ये न देता थेट रूग्णालयांतच उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र रूग्णालयांना रेमडेसिवीरचा पुरवठा करतांना अन्न व औषध प्रशासनाकडून दुजाभाव केला जात असल्याचा प्रकार खुदद पालकमंत्री छगन भुजबळ यांनी उघडकिस आणला. शहरातील काही रूग्णालयांत २५ ते ३० रूग्ण असतांना अशा रूग्णालयांना चक्क एक हजार रेमडेसिवीर वितरण करण्यात आल्याचा प्रकार या चौकशीतून समोर आला आहे. तर इतर रूग्णालयांना अवघे १०० ते २०० रेमडेसिवीर दिले गेल्याचेही समोर आले. या प्रकारावरून भुजबळांनी अन्न व औषध अधिकार्‍यांची चांगलीच कानउघाडणी केली. तसेच थेट सचिव सौरव विजय यांच्याशी चर्चा करत यापुढे या इंजेक्शनचा साठा जिल्हाधिकार्‍यांच्या ताब्यात देण्याचे निर्देश दिले. या प्रकारामुळे रेमडेसिवीरच्या तुटवडा निर्माण करण्यात अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांचाही सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

मायलनकडून मिळणार ७ हजार रेमडेसिवीर
नाशिकमध्ये रमेडेसिवीरचा तुटवडा निर्माण झाल्याने भुजबळांनी नाशिक येथील मायलन कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा करत नाशिकसाठी रेमडेसिवीर उपलब्ध करून देण्यास सांगितले. त्यानूसार बुधवारी कंपनीकडून नाशिकसाठी ७ हजार रमेडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
….
शहरातील काही रूग्णालयांना आवश्यकतेपेक्षा अधिक रमेडेसिवीरचा पुरवठा केला जात असल्याचे माझ्या लक्षात आल्यानंतर मी अधिकार्‍यांशी चर्चा केली. तसेच सचिवांशीही चर्चा केली असून रेमडेसिवीरच्या पुरवठा नियंत्रणाबाबत आदेश दिले आहेत. अतिरिक्त साठा करणार्‍यांवर कारवाई करण्यात येईल, असे आदेशही काढण्यात आले आहे. पुण्यात सीरम कंपनी असतांनाही आपल्याला थेट कंपनीकडून लस विकत घेता येत नाही केंद्राकडून ती उपलब्ध होते त्यामुळे खाजगी वगैरे काही नाही याकाळात सर्व साठा हा सरकारी कोटयात जमा होईल तसे आदेशही देण्यात आले अहे.
-छगन भुजबळ, पालकमंत्री नाशिक

First Published on: April 13, 2021 5:43 PM
Exit mobile version