चोच बांकदार रूप देखणे,मनाने दिसतोय स्वच्छंद

चोच बांकदार रूप देखणे,मनाने दिसतोय स्वच्छंद

यंदा सुरुवातीला रुसलेल्या पावसाळ्यामुळे कोरडेठाक पडलेले जिल्हातील बहुतांश पाणस्थळे व ओसाड रानमाळे तसेच शेतशिवारात दर वर्षी विदेशातून स्थलांतर करून जिल्ह्यात दाखल होणारे पाहुणे पक्ष्यांच्या आगमनाबद्दल साशंकता होती. मात्र, पावसाळा अंती बरसलेल्या धुंवाधार पावसाने जिल्ह्यातील सर्व पाणवठे तुडुंब भरले आहेत . शिवाय माळराने हिरवाईने बहरली आहेत. यामुळे परदेशी पक्ष्यांना पोषक वातावरण निर्माण होऊन त्यांच्यासाठी पर्वणीच उपलब्ध झाली आहे. या पोषक वातावरणाचा अंदाज घेत प्रवाशी पक्षी जिल्ह्यात येऊन दाखल होत आहेत.

विविध प्रकारच्या फ्लाय कॅचर, बी ईटर, नीळकंठ, चातक, विविध धोबी पक्षी, जलस्थानांवर वावरणारे तुतुवार, नदी सुरय, समुद्र पक्षी, मत्सयगरूड आणि नाना तर्‍हेच्या बदकांची पहिली तुकडी ऑक्टोबर महिन्यात येऊन दाखल झाल्याची नोंद पक्षी व पर्यावरण अभ्यासकांनी केली आहे. जिल्ह्यातील शेतशिवारातील पिकांच्या गर्दीत व गवताने अच्छादित झालेल्या माळरानांवर तसेच पाणवठ्यावर युरेशियन व भारतीय नीलकंठ, चातकासह विविध फ्लाय कॅचर, पर्णवटवट्या, बी ईटर, धोबी, नदी सुरय, तुतूवार, मत्सयघार, गरूड, समुद्र पक्षी (गल्स), पाणटिवळा (गॉडविट) परी (शॉव्हलर), सोनुला या बदकांची पहिली तुकडी गेल्या महिन्यात येऊन दाखल झाले आहेत.

विदेशी पाहुणे दाखल
विदेशी पक्षी सामान्यतः तीन कारणांसाठी स्थलांतर करून येतात. युरोप, दक्षिण आफ्रिका, खंडांसह सायबेरिया, अफगाणिस्तान, हिमालय या शीत प्रदेशात हिवाळ्यात हिमवृष्टी होत असते; त्यामुळे तेथील पक्षीजीवन बाधित होते. त्यांना खाद्यान्नाची तुटवडा भासू लागते.शीत प्रदेशातील हे पक्षी आपले जीवन सुसह्य करण्यासाठी भारतीय उपखंडातील विविध ठिकाणी येऊन दाखल होतात. भारतात येऊन पाहुणे म्हणून वावरत हे विदेशी पक्षी सोलापूर जिल्ह्यातील निवडक जलस्थाने व माळरानांवरील अन्नाचे भक्षण करत आपले उदरनिर्वाह करून घेतात. पुढील तीन-चार महिन्यांच्या वास्तव्यानंतर परत हे पक्षी आपल्या मूळस्थानी परततात. दरवर्षी हाच क्रम अनुभवण्यास मिळतो; मात्र स्थलांतरित पक्ष्यांचे जीवनक्रम हवामानावर अवलंबून असते.

हजारो किलोमीटर अंतराचा प्रवास करून आलेले चिमुकल्या ते महाकायी स्थलांतर पक्ष्यांचे सोलापूर जिल्ह्यातील विविध पाणवठे व माळरानांवर पुढील दोन-तीन महिने संमेलन भरणार आहे; त्यामुळे यंदा जिल्ह्यातील व जिल्हा बाहेरील पक्षी निरीक्षकांना पर्वणी ठरणार आहे. दूरवरून येऊन आपल्याला हर्षोल्लास करणार्‍या या गगनभरारींना पोषक वातावरण मिळवून देण्यासाठी निसर्ग प्रेमींनी पर्यावरणाचे समतोलन राखण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.
– डॉ. अरविंद कुंभार, पक्षी व पर्यावरण अभ्यासक, अकलूज

First Published on: December 9, 2019 1:47 AM
Exit mobile version