वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरेंकडून चिरंजीव तेजसला अनोखे गिफ्ट

वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरेंकडून चिरंजीव तेजसला अनोखे गिफ्ट

 शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे लहानग्या तेजसला पाहून एकदा म्हणाले होते : हा मुलगा डॅशिंग आहे. तो काही आगळे वेगळे करून दाखवेल. बाळासाहेब यांचे शब्द आज खरे ठरत आहेत. तेजस ठाकरे वन्यजीव अभ्यासात दमदार पाऊल टाकत पुढे चालला आहे. तेजसने नुकताच उत्तर पश्चिम घाट संरक्षित वनामध्ये जमिनीवरील गोगलगाईंचे संशोधन करण्याचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारला प्रस्ताव पाठवला होता. विशेष म्हणजे तेजसला या संशोधनसाठी परवानगी मिळाली ती शुक्रवारी ७ ऑगस्टला त्याच्या वाढदिवशी. वाढदिवसानिमित्त तेजसला त्याच्या वडिलांकडून म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून हे अनोखे गिफ्ट मिळाले आहे.

उत्तर पश्चिम घाट संरक्षित क्षेत्रात गोगलगाईंचाअभ्यास करण्यासाठी तेजसने राज्य सरकारला प्रस्ताव पाठवला होता. या संदर्भात वन्यजीव मंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या प्रस्तावाला मान्यता दिली. या अभ्यासासाठी तेजस ठाकरेसह अनिकेत मराठे, स्वप्निल पवार आणि अमृत भोसले यांना परवानगी मिळाली आहे.

जैवविविधता, खनिज संपत्ती यांनी समृद्ध असलेला व अनेक प्रजातींचा अधिवास असलेला पश्चिम घाट हा आकर्षण केंद्र आहे. फक्त झाडांवर राहणार्‍या बेडकांची अंडी खाणार्‍या मांजर्‍या सापाच्या नवीन प्रजातीचा शोध तेजस ठाकरेंनी लावला होता. त्या सापाला ‘ठाकरेंचा मांजर्‍या साप’ म्हणून नाव देण्यात आले. तेजस ठाकरे यांनी पहिल्यांदा हा साप पश्चिम घाटामध्ये पाहिला होता. तेजस यांना हा साप वेगळा वाटला आणि त्याची बरीच माहिती त्यांनी संशोधक वरद गिरी यांना दिली होती.

तेजस ठाकरे हा वन्यजीव व प्राणीमित्र असून तेजस आणि त्यांच्या टीमने पालींच्या दोन नवीन प्रजाती शोधल्या आहेत. कोयनेच्या खोर्‍यातून सापडलेल्या पालीच्या प्रजातीला ‘निपास्पिस कोयनाएन्सिस’ आणि आंबा घाटामधून सापडलेल्या प्रजातीला ‘निमास्पिस आंबा’ अशी नावे देण्यात आली आहेत. यापूर्वी तेजस यांनी खेकड्याच्या नव्या प्रजातीचा शोध लावला असून हा खेकडा ‘ठाकरे’ यांच्याच नावाने ओळखला जात आहे.

लाल-जांभळ्या व भगव्या रंगाच्या या खेकड्याला ‘ग्युबर्नेटोरियन ठाकरे’ असे नाव देण्यात आले होते. तेजस हे कला शाखेचे विद्यार्थी असून वन आणि वन्यजीवांच्या अभ्यासाची त्यांना आवड आहे. याच आवडीतून त्यांची विविध ठिकाणी भ्रमंती सुरू असते. कोकणातील जंगलात दुर्मिळ सापांच्या जातीचा शोध घेण्यासाठी गेलेल्या तेजसला सावंतवाडीजवळच्या रघुवीर घाटावर असलेल्या धबधब्यात खेकड्यांच्या पाच नव्या जाती सापडल्या आहेत.

First Published on: August 9, 2020 7:20 AM
Exit mobile version