पीएम मोदींबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून नाना पटोलेंविरोधात पुण्यात भाजपचं आंदोलन

पीएम मोदींबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून नाना पटोलेंविरोधात पुण्यात भाजपचं आंदोलन

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी नावाचा वापर करत पुन्हा एकदा आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे भाजप आक्रमक झाली आहे. आज पुण्यात भाजप नेत्यांकडून नाना पटोलेंविरोधात आंदोलन केलं जातंय. या आंदोलनामध्ये भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक, शहाराध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. यावेळी काल नाना पटोले यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अपशब्द वापरले. केवळ प्रसिद्धीसाठी पंतप्रधानांवर टीका केली जात आहे, असं भाजपच्या कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस संपूर्ण देशामध्ये संपण्याच्या मार्गावर

मुळात काँग्रेस संपूर्ण देशामध्ये संपण्याच्या मार्गावर आहे. तसेच उरली-सुरली जी काही काँग्रेस आहे. ते सुद्धा संपवण्याचं काम नाना पटोले करत आहेत. परंतु या वक्तव्यामुळे जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे. नाना पटोलेंचा निषेध करण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत आणि नानांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचं वक्तव्य भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलंय.

गावगुंडांचं समर्थन भाजप नेते एवढं का करतंय? – नाना पटोलेंचा सवाल

या घटनेच्या सुरूवातीलाच मी सांगितलं होतं की, जे लोकसमुहात बोललो होतो. तेव्हा मी गावगुंडांबाबत बोललो होतो. ते स्टेटमेंट मी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात केलेलं नव्हतं. डॉ.मनमोहन सिंग यांच्याविरोधात भाजप काय म्हणत होते हे सर्वच देशातील जनतेला माहितीये. या गावगुंडांचं समर्थन भाजप नेते एवढं का करतय?, असा प्रश्न राज्याच्या जनतेसमोर उपस्थित झालाय. काल मी जे विधान केलं त्यामध्ये त्या वक्तव्यापेक्षा जनतेचे प्रश्न महत्त्वाचे होते,असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पेटोले म्हणाले.

नाना पटोले यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, गावगुंडांनी माध्यमांसमोर येऊन त्यांना मोदी म्हणण्याबाबत खुलासा केला आहे. तसेच गावकऱ्यांनी त्याचं नाव मोदी का ठेवलं? तो सुद्धा उल्लेख त्याने केलाय. त्यामुळे बदनामी करण्याचं काम तुम्ही थांबवा. तसेच जर पुतळे जाळायचे असतील तर भारत माता की जय म्हणून देश विकणाऱ्यांचे जाळा. बेटी बचाव, बेटी पटाव म्हणण्याऱ्यांचे पुतळे जाळा. शेतकऱ्यांच्या अंगावार गाड्या चालून त्यांना मारणं अशा केंद्रातील मंत्र्यांच्या विरोधात त्यांचे पुतळे जाळा.

गावगुंडांविरोधात काँग्रेस नेहमीच पुढे राहणार

शेतकऱ्यांचे प्रश्न आणि बेरोजगारी अशा मुळ प्रश्नांना भाजप दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत आहे. ते महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेला चांगलंच माहितीये. गावगुंडांविरोधात काँग्रेस नेहमीच पुढे राहणार, असं देखील नाना पटोले म्हणाले.

नाना पटोलेंच्या वक्तव्यानंतर नागपूरात भाजप काल आक्रमक झाली होती. ज्यांची बायको पळून जाते त्याला मोदी म्हणतात असं वक्तव्य करणाऱ्या पटोलेंचं डोकं फिरलं असून त्यांना नागपूरच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची गरज आहे. संपूर्ण काँग्रेस पार्टी आम्ही संपवल्याशिवाय राहणार नाही. आम्ही महाराष्ट्रभर आंदोलन करणार आहोत. तसेच नाना पटोलेंना आम्ही सोडणार नाही, असा इशारा भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी दिला होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा पुण्यामध्ये भाजपने आंदोलनाला सुरूवात केलीय.

काय म्हणाले नाना पटोले ?

देशाची बेराजगारी आणि महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. सामान्य नागरिकांचं जगणं कठीण झालंय. शेतकऱ्यांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. छोटे उद्योजक आणि व्यापारांचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. केंद्रातील सरकार फेल झालेलं सरकार आहे. ज्याची बायको पळते त्याचं नाव मोदी ठरतं असं हे झाल्यानंतर काय बाकी राहीलेलं आहे, असं नाना पटोले म्हणाले.

राज्यात कोणत्या ठिकाणी आंदोलनं?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहेत. मुंबई, कोल्हापूर, पुणे आणि औरंगाबाद याठिकाणी भाजप आक्रमक झाल्याचे दिसत आहे. मुंबईत दादरमध्ये भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. नाना पटोलेंच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन याठिकाणी करण्यात आले.


हेही वाचा : ज्याची बायको पळते त्याचं नाव मोदी ठरतं, नाना पटोलेंच्या वक्तव्यावर भाजप आक्रमक


 

First Published on: January 24, 2022 11:15 AM
Exit mobile version