ते आता फक्त शिल्लक सेनेचे पक्षप्रमुख; बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

ते आता फक्त शिल्लक सेनेचे पक्षप्रमुख; बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

आज उद्धव ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची अधिकृत घोषणा झाली. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत युतीची अधिकृत घोषणा केली. ठाकरे गट- वंचितच्या युतीवर भाजप नेत्यांकडून टीकास्त्र डागले जात आहे. यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही या युतीवरून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे आजपासून शिल्लक सेनेचे पक्षप्रमुख असतील त्यांचा पक्षप्रमुख पदाचा कालावधी आज संपत आहे. जे आपल्या 40 आमदारांना सांभाळू शकले नाहीत, ते वंचित सोबतची युती किती दिवस सांभाळतील याबाबत शंका वाटतेय, म्हणत चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे.

यावेळी बावनकुळेंनी कसबा, पिंपरी या दोन रिक्त विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीवरही भाष्य केलं. कसबा आणि पिंपरीमध्ये उमेदवार द्यायचा की निवडणूक बिनविरोधात करायची हा महाविकास आघाडीचा प्रश्न आहे. पण आम्ही दोन्हीकडे उमेदवार देणार आणि आम्हीच विजयी होणार असा विश्वास बावनकुळेंनी व्यक्त केला आहे.

बावनकुळे पुढे म्हणाले की, मी वाचाळवीर नाही तर सरकार आणि पक्षात समन्वय राखण्यासाठी बोलतो. भाजप राजकारण करत नाही. आम्ही 90 टक्के विकास काम करतो. पण विरोधी पक्षाने भोंगे वाजवणं बंद केलं तर आम्हाला देखील बोलण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे विरोधी पक्षांनी सकारात्मक काम करावं, असा सल्लाही बावनकुळेंनी दिला आहे.


हेही वाचा : महाराष्ट्रात बाळासाहेबांची मोठी ताकद, त्याचा ठाकरे गट-वंचित युतीला नक्कीच फायदा – अनिल देशमुख

First Published on: January 23, 2023 3:21 PM
Exit mobile version