अमित शहा सहकार खात्याचे मंत्री असल्यामुळे अनेकांना भीती – दरेकर

अमित शहा सहकार खात्याचे मंत्री असल्यामुळे अनेकांना भीती – दरेकर

परीक्षेतील घोटाळ्याची CBI चौकशी करा, अन्यथा तीव्र आंदोलन करु, दरेकरांचा इशारा

केंद्राने नव्याने तयार केलेल्या सहकार खात्यावरुन वादविवाद सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यघटनेनुसार सहकार हा विषय राज्य सरकारचाच आहे, असं म्हटलं होतं. तसंच राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी देखील सोमवारी बोलताना सहकार हा विषय राज्याच्याच अंतर्गत येतो, असं सांगितलं. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सहकार खात्याचे मंत्री असल्यामुळे अनेकांना भीती वाटत आहे, असं म्हटलं. ते आज माध्यमांशी बोलत होते.

“देशपातळीवर सहकार क्षेत्र वृद्धिंगत व्हावं यासाठीच हे खातं आहे. महाराष्ट्रसारख्या राज्यांमध्ये जो सहकार अडचणीत आहे, त्याला उर्जितावस्था, त्याला ताकद देण्याचा चांगला उद्देश त्यामागे आहे. परंतु, अमित शहा त्या खात्याचे मंत्री असल्यामुळे काही लोकांना धस्स होतंय. परंतु महाराष्ट्रातील सहकार अत्यंत महत्त्वाचं आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचं काम हा सहकार करतो. मात्र, आज सहकार क्षेत्र अडचणीत आहे. महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला पुन्हा एकदा वैभवाचे दिवस आणण्यामध्ये हे खातं योगदान देईल,” असा विश्वास प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला.

महाविकास आघाडी आतून पोखरलीय

“तुझं माझं जमेना अन् तुझ्या वाचून करमेना अशी परिस्थिती महाविकास आघाडीची झाली आहे. एकमेकांच्या पक्षातील माणसं घेण्याची मोहीम महाराष्ट्रात सर्वत्र सुरु आहे. एकाबाजूला महाविकास आघाडीत आम्ही एकत्र आहोत, पाच वर्ष सरकार स्थिर आहे असं सांगायचं अन् दुसरीकडे एकमेकांच्या पक्षातील लोकांना पक्षात घेण्याची मोहीम मात्र सुरु आहे. भाजपच्या आसुयेपोटी, विरोधासाठी किंवा भीतीने हे पक्ष एकत्र आहेत असं दाखवत आहेत. परंतु आतून सगळं पोखरलेलं आहे. एकमेकांच्या पाय खेचण्याचे प्रकार सुरु आहेत,” असं दरेकर म्हणाले.

 

First Published on: July 13, 2021 12:10 PM
Exit mobile version