काँग्रेसचं भविष्य राहिलं नाही, अशोक चव्हाणांनी विचार करावा, भाजपकडून थेट ऑफर

काँग्रेसचं भविष्य राहिलं नाही, अशोक चव्हाणांनी विचार करावा, भाजपकडून थेट ऑफर

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपण भाजपात प्रवेश करणार असल्याचं सांगितलं आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा मागील काही महिन्यांपासून सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विश्वासदर्शक ठरावावेळी काँग्रेसचे ११ आमदार गैरहजर होते. त्यात अशोक चव्हाण यांचं नाव होतं. त्यावेळी सुद्धा अशोक चव्हाण हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. परंतु अशोक चव्हाणांनी त्या सर्व प्रकारच्या चर्चा फेटाळून लावल्या होत्या.

भाजपच्या नेत्यांकडून अशोक चव्हाण यांना आता भाजप प्रवेशासाठी खुली ऑफर देण्यात येत आहेत. काँग्रेस एक डुबतं जहाज आहे, अशा प्रकारची टीका वारंवार भाजपकडून काँग्रेसवर करण्यात आली. दरम्यान, भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अशोक चव्हाणांना ही ऑफर दिली आहे. काँग्रेसचं काही भविष्य राहिलं नाही, अशोक चव्हाणांनीही आता विचार करायला हवा, असं मत राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलं आहे.

काँग्रेसकडून लोकांच्या फार अपेक्षा राहिलेल्या नाहीत, त्यामुळे अशोक चव्हाणांनी त्यांच्या भूमिकांचा पुनर्विचार करायला हरकत नाही, असंही विखे पाटील म्हणाले.

काँग्रेसमधला अंतर्गत वाद चव्हाट्यावर असतानाच राधाकृष्ण विखे पाटील यांनी अशोक चव्हाणांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली आहे. नाशिक पदवीधर पोटनिवडणुकीमध्ये सुधीर तांबे, सत्यजीत तांबे यांच्या बंडानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यात वाद झाला होता. परंतु एच के पाटील आणि काँग्रेसने कार्यकारिणीची बैठक घेतल्यानंतर काँग्रेसचा हा वाद मिटला आहे. मात्र, राधाकृष्ण विखे पाटील यांनी अशोक चव्हाण यांना खुली ऑफर दिल्यामुळे भाजपची पुन्हा एकदा घरफोडी सुरू आहे की, नवी खेळी आहे, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा : बंडापूर्वीच सर्व अभ्यास केल्याने निकाल आमच्याच बाजुने.., बच्चू कडूंचा दावा


 

First Published on: February 16, 2023 8:44 PM
Exit mobile version