उद्धव ठाकरेंची शिवसेनाच मुंबईच्या विकासाची मारेकरी; भाजपा नेत्याचं टीकास्त्र

उद्धव ठाकरेंची शिवसेनाच मुंबईच्या विकासाची मारेकरी; भाजपा नेत्याचं टीकास्त्र

मुंबई : स्वतःला हिंदुत्व, मराठी आणि मुंबईचे ठेकेदार मानणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी हिंदू समाज आणि मुंबईतील जनतेत फूट पाडण्याचे घाणेरडे काम सुरू केले आहे. त्यांनी मुंबईच्या विकासात खोडा घालण्याचे काम केले असून मुंबईच्या विकासाची खरी मारेकरी उद्धव ठाकरे यांचीच शिवसेना असल्याची जहरी टीका भाजपा मुंबई प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी केली. मुंबई भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित ‘जागर मुंबईचा’ या अभियानंतर्गत जाहीर सभेत ते शनिवारी बोलत होते. कांदिवली येथे भव्य सभा पार पडली. खासदार गोपाळ शेट्टी, आमदार योगेश सागर प्रमुख उपस्थित होते.

यावेळी अतुल भातखळकर म्हणाले, उद्धव ठाकरे यांचे कर्तृत्व असे आहे की, त्यांच्या नावातून बाळासाहेब ठाकरे यांचे नाव हटवायला हवे. शिवप्रताप दिनानिमित अफजलखानाच्या कबरीवरील अतिक्रमण हटवण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने केले. मात्र, सामना वर्तमानपत्रात याची बातमी नाही. कंगना राणावतचे घर पाडले तेव्हा त्याची हेडिंग होती. तुम्ही खोटे हिंदुत्ववादी आहात अशी टीका त्यांनी केली. उद्धव ठाकरे यांनी दगाबाजी करून मुख्यमंत्री पद मिळवले. मुंबईतील अनेक प्रकल्प रोखण्याचे काम उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मुलाने केले.

कोणत्याही व्यवसाय न करता उद्धव ठाकरे यांची संपत्ती करोडो रुपये कशी? महापालिकेतून येणारे खोके बंद झाल्यामुळे उद्धव ठाकरे अस्वस्थ झाले आहेत असा टोला आ. भातखळकर यांनी लगावला. मुंबई मेट्रोचा वाढत्या खर्चाला उद्धव ठाकरे जबाबदार आहेत. कोरोना काळात उद्धव ठाकरे किंवा त्यांचा मुलगा एकदाही घराबाहेर पडला नाही. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते बाहेर पडून समाजासाठी काम करत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खरे डॉक्टर असून त्यांच्यामुळेच अडीच वर्षे घरात बसलेले घराबाहेर पडू लागले आहेत. आता त्यांचे आजारपण कुठे गेले? असा सवाल भातखळकर यांनी केला.

यावेळी खासदार गोपाळ शेट्टी म्हणाले, मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात भारतीय जनता पार्टीच्या सदस्यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवला आहे. मुंबई महानगरपालिका फायद्यात येण्यामागे भारतीय जनता पक्षाचे योगदान आहे. भारतीय जनता पार्टीच्या सदस्यांनी शिवसेनेवर अंकुश ठेवण्याचे काम केले. मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी टेंडर सिस्टीम बदलावी लागेल असेही ते म्हणाले.

तर आमदार योगेश सागर म्हणाले, घराणेशाहीचा फायदा एका विशिष्ट घराण्याला झाला. मुंबई महापालिकेत ३ लाख करोड रुपयांचा भ्रष्टाचार केवळ एका परिवारामुळे झाला. लांगूलचालन, भ्रष्टाचार तुष्टीकरणाविरोधात उभा राहावे लागेल.


हेही वाचा : मोदी सरकारच्या काळात पीकविमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची लूट; राहुल गांधींची टीका

First Published on: November 12, 2022 9:17 PM
Exit mobile version