भाजपाने कर्करोगामुळे गमावले दिग्गज नेते… पण ‘या’ नेत्यांनी दिली यशस्वी लढत

भाजपाने कर्करोगामुळे गमावले दिग्गज नेते… पण ‘या’ नेत्यांनी दिली यशस्वी लढत

मुंबई : देशात कर्करोगाचा विळखा हळूहळू घट्ट होत आहेत. अनेकांनी या जीवघेण्या रोगावर मात केली असली तरी, काहींना मृत्यू गाठले आहे. कर्करोगामुळे देशाने आणि महाराष्ट्राने अनेक लढवय्ये नेते गमावले आहेत. भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक ही अलीकडची उदाहरणे म्हणता येतील. यांच्याशिवाय काही भाजपा नेतेदेखील या रोगाच्या विळख्यात अडकल्याचे पाहायला मिळाले आहे.

लक्ष्मण जगतापांचा एक वर्ष लढा

भाजपाचे पिपंरी चिंचवड शहरातील आमदार लक्ष्मण जगताप यांचे 03 जानेवारी 2023 रोजी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. एक वर्षाहून जास्त काळ त्यांचा कर्करोगाशी सामना सुरू होता. बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये निधन झाले. लक्ष्मण जगताप लढवय्या नेते होते. भाजपामध्ये पुण्यातील सक्षम नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. कर्करोगाने ग्रासलेले लक्ष्मण जगताप अनेक दिवसांपासून अंथरुणाला खिळून होते. त्यामुळे ते राजकारणात सक्रिय नव्हते.

कर्तव्यदक्ष मुक्ता टिळक

कर्करोगाने भाजपाच्या आमदार मुक्ता टिळक यांचं सुद्धा निधन झाले. हिवाळी अधिवेशन सुरू असताना 22 डिसेंबर 2022 रोजी मुक्ता टिळक यांच्या निधनाची बातमी आली आणि पुण्यापासून नागपूरपर्यंत शोककळा पसरली. मुक्ता टिळक यांची कर्करोगाशी झुंज अपयशी ठरली. त्यासुद्धा अंथरुणाला खिळून होत्या. आजारी असल्यामुळे त्यांना विधान परिषदच्या निवडणुकीला एअरअँब्युल्सने आणण्यात आले होते. कर्करोगाने हैराण झाले असतानाही मुक्ता टिळक यांनी आपलं कर्तव्य पार पाडलं. मुक्ता टिळक भाजपच्या फायर फायटर आमदार होत्या.

अरुण जेटलींनी घेतले विदेशात उपचार

देशाचे माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे 24 ऑगस्ट 20199 रोजी निधन झालं. अरुण जेटली सुद्धा कर्करोगाचा सामना करत होते. वयाच्या 66व्या वर्षी त्यांचे दीर्घ आजारामुळे निधन झाले. सॉफ्ट टिश्यू कँसरवर उपचार घेण्यासाठी अरुण जेटली न्यूयॉर्कला गेले होते. यानंतर त्यांनी घरी आल्यावर ‘बरं वाटतंय’ असं ट्वीट केले होते. कर्करोगासह अरुण जेटली यांना किडनीविकार आणि डायबिटीस असे आजार होते.

अनंत कुमार यांची प्रदीर्घ झुंज

कर्नाटकमधील भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अनंत कुमार यांचेही कर्करोगाने 12 नोव्हेंबर 2018 रोजी निधन झाले. कर्करोगाशी त्यांची अनेक महिन्यांपासून झुंज सुरू होती. आजारी असल्याने त्यांना अमेरिका आणि ब्रिटनमध्ये उपचार घेतला होता. यानंतर ते बंगळुरुमध्ये परतले होते. तब्येत खालावल्यानंतर त्यांना पुन्हा शंकरा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कर्करोग आणि संसर्गामुळे उपचारात अडचणी आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.

रस्त्यावर उतरून काम करणारे मनोहर पर्रीकर

माजी केंद्रीय मंत्री आणि गोव्यातील भाजपाचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचीही कर्करोगाशी झुंज अपयशी ठरली. कर्करोगावर उपचार सुरू असताना 17 मार्च 2019 रोजी मनोहर पर्रिकर यांचे निधन झाले. अखेरच्या श्वासापर्यंत पर्रिकर रस्त्यावर उतरून विकासकामांचा आढावा घेत होते. वर्षभराहून अधिक काळ ते कर्करोगावर उपचार घेत होते. तब्येत खालावल्यामुळे पर्रिकरांना पणजीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

जीवघेण्या आजारावर यशस्वी मात

अनेक नेत्यांचा कर्करोगाशी सामना अपयशी ठरला. पण राजकारणात असेही नेते आहेत, जे कर्करोगावर मात करण्यात यशस्वी ठरले आहेत. यामध्ये एक भाजपाचे ज्येष्ठ नेते राम नाईक आहेत तर दुसरे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आहेत. राम नाईक यांना 1993 साली कर्करोग झाला असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर त्यांनी उपचार घेत कर्करोगावर यशस्वी मात केली. कर्करोग झाल्यावर रुग्णाला नैराश्य येते. मानसिक त्रास होतो; परंतु कर्करोगावर विश्वासाने मात करता येते, असे राम नाईक यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना 2004 साली कॅन्सरचे निदान झाले होते. त्यावेळी एका डॉक्टरांनी ‘तुमच्याकडे शेवटचे सहा महिने उरले,’ असल्याचे सांगितले होते. त्यावर आपण डॉक्टरांशी पैज लावली होती, असे पवार यांनी अलीकडेच एका कार्यक्रमात सांगितले.

First Published on: January 3, 2023 4:12 PM
Exit mobile version