मोदी सरकारचे काम पोहचवण्यासाठी भाजपची राज्यभर मोहीम – चंद्रकांत पाटील

मोदी सरकारचे काम पोहचवण्यासाठी भाजपची राज्यभर मोहीम – चंद्रकांत पाटील

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi ) यांच्या सरकारला ३० मे रोजी आठ वर्षे पूर्ण झाली असून मोदी सरकारचा हा कार्यकाळ म्हणजे देशासाठी सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण पर्व आहे. मोदी सरकारच्या कामाची माहिती जनेतेपर्यंत पोहोचविण्यासाठी भारतीय जनता पार्टीने (BJP) महाराष्ट्रात व्यापक जनसंपर्क कार्यक्रम सुरू केला आहे, अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil)  यांनी गुरुवारी मुंबईत (mumbai) दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेस प्रदेश उपाध्यक्ष व जनसंपर्क मोहिमेचे संयोजक जयप्रकाश ठाकूर, प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, प्रदेश सचिव श्वेता शालिनी व प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये उपस्थित होते.

 सामान्य लोकांच्या जिव्हाळ्याची कामे

चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारच्या आठ वर्षाच्या कालावधीत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. घटनेचे ३७० वे कलम रद्द करणे किंवा अयोध्या येथे श्रीरामजन्मस्थानी भव्य मंदिर उभारणे असे महत्त्वाचे विषय त्यांनी मार्गी लावले. त्यांनी गरीब कल्याणासाठी मिशन म्हणून काम केले. देशात ९ कोटी गॅस कनेक्शन देणे, दोन कोटी घरांना वीज कनेक्शन देणे, सहा लाख गावे हागणदारीमुक्त करणे, सामान्य लोकांची ४२ कोटी नवी बँक खाती उघडणे असे सामान्य लोकांच्या जिव्हाळ्याची अनेक कामे पंतप्रधान मोदी यांनी यशस्वीरित्या केली. त्यांचे हे काम जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रदेश भाजपाने मोहीम सुरू केली आहे.

घरोघरी माहिती पत्रके देणार

ते म्हणाले की, भाजपाच्या किसान मोर्चाने १ मे रोजी राज्यातील २९५ ठिकाणी शिवार सभा आयोजित करून मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामाची माहिती दिली. महिला मोर्चातर्फे आज राज्यभर ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. अनुसूचित जाती मोर्चातर्फे बाबासाहेब विश्वास रॅली काढण्यात येणार आहे. अनुसूचित जमाती मोर्चातर्फे बिरसा मुंडा रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. युवा मोर्चातर्फे राज्यात ठिकठिकाणी विकासतीर्थ रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. तसेच पक्षाचे कार्यकर्ते घरोघर जाऊन मोदी सरकारने केलेल्या कामाची माहिती देणारी पत्रके लोकांना देणार आहेत.

राज्यसभा निवडणुकीत भाजपाचे पारडे जड

भाजपाचे तीन राज्यसभा सदस्य निवृत्त होत असल्याने पक्षाने तीन उमेदवार निवडणुकीस उभे केले आहेत. भाजपाच्या संख्याबळानुसार दोन उमेदवार सहज निवडून येतात व त्याखेरीज तिसऱ्या उमेदवारासाठी आमच्याकडे पहिल्या पसंतीची ३२ जादा मते आहेत. त्यामुळे या जागेसाठी आमचाच दावा आहे, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.  महाविकास आघाडीकडे किती जास्त मते आहेत, हे त्यांनी सांगावे. या निवडणुकीत मतदारांनी पक्षाच्या प्रतिनिधीला मत दाखवायचे असले तरी व्हिप पाळला नाही म्हणून आमदारकी रद्द करता येत नाही. अपक्षांनी तर त्यांचे मत कोणालाही दाखवायचे नाही. अशा स्थितीत आमदारांनी सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून मतदान करावे. महाविकास आघाडीनेही वस्तुस्थिती मान्य करावी आणि अनावश्यक तणाव दूर करावा. भाजपाचे महाराष्ट्रासाठीचे राज्यसभा निवडणूक प्रभारी म्हणून कद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

पंतप्रधानांच्या उपस्थितीत देहू येथे कार्यक्रम

श्री क्षेत्र देहू येथे संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण  १४ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यावेळी पन्नास हजार वारकऱ्यांच्या उपस्थितीत भव्य मेळाव्याचे आयोजन केले आहे. श्री संत तुकाराम महाराज देहू संस्थानने हा कार्यक्रम आयोजित केला आहे, अशी माहिती माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.  पंतप्रधानांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाची तयारी वेगात चालू असल्याचे त्यांनी सांगितले.

 

First Published on: June 2, 2022 5:01 PM
Exit mobile version