१५ दिवसांनंतर नितेश राणे प्रकटले

१५ दिवसांनंतर नितेश राणे प्रकटले

भाजप आमदार नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत दाखल झाले आहेत. संतोष परब हल्ला प्रकरणात राणेंवर अटकेची टांगती तलवार असताना गेल्या अनेक दिवसांपासून राणे नॉटरिचेबल होते, नितेश राणे कुठे आहेत? असा सवाल सर्वच स्तरातून विचारला जात होता. गुरुवारी नितेश राणे कणकवलीत दाखल होताच भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी राणेंना पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत केले, त्यानंतर नितेश राणेंनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत प्रवेश केला.

जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मनिष दळवी आणि उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांचे पुष्पगुच्छ देऊन नितेश यांनी अभिनंदनही केले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक झाली, भाजपने मोठा विजय नोंदवला, मात्र तरीही नितेश राणे अटकेच्या टांगत्या तलवारीमुळे कुणासमोरही आले नव्हते. आता मात्र न्यायलयाने अटकेपासून संरक्षण दिल्याने नितेश राणे तब्बल 15 दिवसांनी समोर आले, राणे इतके दिवस कुठे अज्ञातवासात होते, हे मात्र अजूनही कुणाला कळाले नाही.

शिवसेनेला धक्का देत भाजपने सिंधुदुर्ग जिल्हा बँक काबीज केली, त्यानंतर गुरुवारी अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड करण्यात आली. नितेश राणे यांनी थेट जिल्हा बँकेत दाखल होत अध्यक्ष उपाध्यांचे अभिनंदन केले. गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्गातला राणेंचा विजय चांगलाच चर्चेत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतल्या विजयात नितेश राणेंची भूमिका निर्णयक राहिली आहे. मात्र संतोष परब प्रकरणाचा ससेमिरा मागे लागल्यानंतर राणे कुठेच दिसले नाहीत.

भाजपचा विजय झाला तरी तो विजय साजरा करण्यासाठीही नितेश राणे नव्हते, त्यानंतर गुरुवारी ते थेट सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत दाखल झाल्याचे दिसून आले. नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली, संतोष परब हल्ला प्रकरणात राणेंनी जामिनासाठी हायकोर्टात धाव घेतली आहे, 17 जानेवारीला राणेंच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप नितेश राणे यांच्यावर आहे.

First Published on: January 14, 2022 6:15 AM
Exit mobile version