राज्यात कोरोनाची लस मोफत द्या; राम कदम यांनी लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र

राज्यात कोरोनाची लस मोफत द्या; राम कदम यांनी लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र

भाजप आमदार राम कदम

मुंबई, महाराष्ट्रासह संपूर्ण देशवासियांना कोरोनावरील लसीची प्रतिक्षा लागून राहिली होती. त्यातच आता लस आली असून या लसीकरणाला परवानगी देखील मिळाली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार राम कदम यांनी राज्यातील सर्व नागरिकांना कोरोना साथीच्या आजारापासून मुक्त करण्यासाठी कोरोनाची लस मोफत देण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.

काय म्हणाले राम कदम?

‘जगभरात पसरलेल्या कोरोना साथीच्या संकटाचा परिणाम भारत देशावरही झाला आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि विशेषत: महाराष्ट्र राज्याला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे राज्यात नागरिकांना आर्थिक परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. केंद्र सरकारने आर्थिक मदत पुरवली असून महाराष्ट्र राज्यात गरजूंना मदत देण्यात आलेली नाही. शेतकरी, कामगार, छोटे दुकानदार, टॅक्सी-रिक्षा वाहन चालक अशा कामगार वर्गाला साथीच्या काळात मूलभूत सुविधा मिळाल्या नाहीत. राज्यात खराब अरोग्य यंत्रणेमुळे योग्य उपचार न मिळाल्यामुळे अनेक गरिबांना प्राण देखील गमवावे लागले आहेत. त्यामुळे आता सर्वच नागरिकांना विनाशुल्क कोरोनावरील लस दिली जावी’, अशी अपेक्षा त्यांनी केली आहे.

‘महाराष्ट्र सरकारकडून आशा करतो की राज्यातील प्रत्येक नागरिकास वेळेत कोरोना लस विनामूल्य मिळेल. या अगोदर राज्य सरकार लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यास अपयशी ठरले आहे, म्हणून राज्य सरकारने आता जनहिताकरिता आणि खऱ्या निष्ठेने सेवा करावी. राज्य सरकारने महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी चांगले निर्णय घ्यावेत’, अशी माझी इच्छा आहे.


हेही वाचा – राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ८ जानेवारीला लसीकरणाचा ड्राय रन – राजेश टोपे


First Published on: January 5, 2021 2:01 PM
Exit mobile version