शिवसेनेची सत्ता घालवण्यासाठी शक्य ते सर्व करु; राज ठाकरेंच्या भेटीनंतर लाड यांचं वक्तव्य

शिवसेनेची सत्ता घालवण्यासाठी शक्य ते सर्व करु; राज ठाकरेंच्या भेटीनंतर लाड यांचं वक्तव्य

भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.

मुंबई महापालिकेच्या निवडणूक तोंडावर आल्याने राजकीय घडामोडींना वेग आल्याचं दिसत आहे. भाजपने शिवसेनेला हरवण्यासाठी आतापासूनच हालचाली सुरु केल्या आहेत. महापालिकेत शिवसेनेला पराभूत करण्यासाठी भाजप मनसे सोबत युती करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. दरम्यान, चर्चा सुरु असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे मानले जाणारे भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरेंच्या भेटीनंतर प्रसाद लाड यांनी शिवसेनेला इशारा देणारं आणि राज्याच्या राजकारणात वेगळं काहीतरी घडू शकतं असं विधान केलं आहे.

प्रसाद लाड यांनी आज राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर जाऊन भेट घेतली. राज ठाकरे यांच्यासोबत त्यांनी तब्बल पाऊण तास चर्चा केली. पाऊण तासात नेमकी काय चर्चा झाली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, राज ठाकरेंच्या भेटीनंतर प्रसाद लाड यांनी माध्यमांशी संवाद साधला. शिवसेनेची सत्ता घालवण्यासाठी शक्य ते सर्व करु, असं प्रसाद लाड म्हणाले. “मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकावण्याचा पक्षाचा निर्धार आहे. शिवसेनेची परंपरागत सत्ता खाली करण्यासाठी शक्य ते सर्व करु,” अशी प्रतिक्रिया प्रसाद लाड यांनी दिली. प्रसाद लाड यांच्या विधानाने तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे. प्रसाद लाड यांनी राज ठाकरे यांच्यासोबतची बैठक ही राजकीय नसल्याचं सांगितलं. मात्र, मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मनसेत जवळीक वाढताना दिसत आहे.

शिवसेनेने भाजपची साथ सोडल्यानंतर, भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. मुंबई महापालिकेतील शिवसेनेची सत्ता उलथवून टाकण्याचा निर्धार भाजपने केला आहे. भाजपने मुंबई महापालिका निवडणुकीसाठीचं ‘भाजप येणार, मुंबई घडवणार’ हे घोषवाक्य जाहीर केलं आहे. भाजपसोबत युती करायला शिवसेना नसल्यामुळे भाजप आणि मनसे युती होणार अशा चर्चा सुरु आहेत. याबाबतचे संकेत भाजप नेत्यांनीही दिले. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी मनसेसोबत युतीचे वृत्त फेटाळून लावले. याशिवाय, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील भाजप-मनसे युतीबाबत भाष्य केलं. आमचा राष्ट्रीय पक्ष आहे. त्यामुळे जोपर्यंत मनसे परप्रातियांबद्दल भूमिका बदलत नाहीत, तोपर्यंत त्यांची आमची युती होऊ शकत नाही, असं चंद्रकांत पाटील स्पष्ट केलं आहे.

 

First Published on: January 23, 2021 3:43 PM
Exit mobile version