संभाजी महाराज दारूच्या कैफेत; ‘त्या’ पुस्तकावर अखेर बंदी

संभाजी महाराज दारूच्या कैफेत; ‘त्या’ पुस्तकावर अखेर बंदी

हेच ते 'समर्थ श्री रामदास स्वामी' पुस्तक

सर्व शिक्षा अभियानातील ‘समर्थ श्री रामदास स्वामी‘ हे पुस्तक यंदाच्या वर्षापासून शालेय विद्यार्थ्यांमध्ये वितरीत केले जाऊ लागले. परंतु हे पुस्तक वादग्रस्त ठरले आहे. या पुस्तकात हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांविषयी वादग्रस्त उल्लेख करण्यात आला आहे. या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांचा दारुड्या असा उल्लेख करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. डॉ. शुभा साठे लिखित ‘समर्थ श्री रामदास स्वामी’ या पुस्तकात हा आक्षेपार्ह मजकूर प्रकाशित झाला आहे. त्यामुळे राज्य शासनाचे ‘सर्व शिक्षा अभियाना’तील हे पुस्तक वादाच्या भोवर्‍यात सापडले होते. परंतु आता महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने मुंबई महापालिका, राज्यातल्या सर्व जिल्हा परिषद शाळांना आणि शिक्षण अधिकाऱ्यांना हे पुस्तक वितरीत न करण्याचे आदेश दिले आहेत.

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने मुंबई महापालिका, राज्यातल्या सर्व जिल्हा परिषद शाळांना आणि शिक्षण अधिकाऱ्यांना पाठवलेले पत्र

लेखिका डॉ. शुभा साठे यांनी हे पुस्तक लिहिले आहे. नागपूर येथील लाखे प्रकाशनाने या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे. या पुस्तकाचा सर्व शिक्षा अभियानात समावेश करण्यात आला आहे. या पुस्तकातील पृष्ठ क्रमांक १८ वर संभाजी महाराजांविषयी उल्लेख आहे. ‘रायगडावरुन संभाजीराजांनी केलेल्या अनेक खोट्या अत्याचारांच्या बातम्या समर्थांच्या कानावर येत होत्या. संभाजी राजा दारुच्या कैफात आणि कलुशाच्या जाळ्यात सापडला होता. स्वराज्याची ही अवहेलना पाहून समर्थांचे अंत:करण तिळतिळ तुटत होते. मनातला राम अखेरच्या कर्तव्याची टोचणी लावत होता. अखेर समर्थांनी संभाजीराजांना पत्र लिहिले’, असा उल्लेख या पुस्तकात आहे. पुस्तकाचा सर्व शिक्षा अभियानात समावेश झाल्याने त्याचे विद्यार्थ्यांमध्ये वितरण सुरू झाले. ही बाब अनेकांच्या लक्षात आली. त्यामुळे अनेकांनी मोठ्या प्रमाणात या पुस्तकाला विरोध दर्शवला. काही संघटनांनीदेखील या पुस्तकाला विरोध दर्शवला, तसेच लेखिका साठे यांच्यावर कारवाई करण्याची मागणीदेखील होत आहे.

संभाजी ब्रिगेडचा तीव्र आक्षेप

‘संभाजी राजा दारुच्या कैफात आणि कलुशाच्या जाळ्यात सापडला होता’ या वाक्यावर संभाजी ब्रिगेडने तीव्र आक्षेप घेतला आहे. इतिहासात असा कोणताही पुरावा नसताना कोणत्या आधारावर हा उल्लेख केला. पुस्तक न वाचताच पुस्तकाचा सर्व शिक्षा अभियानात कसा काय समावेश केलात?कुठलाही पुरावा नसताना छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करण्यात आली, असा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. असा संभाजी महाराजांविषयी दिशाभूल करणारा आणि बदनामी करणारा मजकूर शालेय प्राथमिक पुस्तकात छापला जातो. हे राज्य सरकारचे दुर्दैव आहे, असेही ब्रिगेडने म्हटले आहे. या संपूर्ण प्रकाराला जबाबदार असणाऱ्या सर्वांवर कारवाई करण्याची मागणी ब्रिगेडने केली आहे.

First Published on: October 13, 2018 3:05 PM
Exit mobile version