पुण्यात मोबाइल गेमच्या आहारी गेलेल्या तरुणाची आत्महत्या

पुण्यामध्ये मोबाइल गेमच्या नादात एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. फक्त वयवर्ष १९ असणाऱ्या तरूणाने मोबाइल गेमच्या असलेल्या वेडापायी स्वतःचा जीव संपवला आहे. ही घटना काल गुरूवारी घडली आहे. ही घटना पुण्यातील हवेली तालुक्यातील कोरेगाव भीमा येथील पेरणेफाटा या भागात घडली आहे.

या घटनेत गळफास घेऊन आत्महत्या करून आपला जीव संपवणाऱ्या तरूणाचे नाव संतोष माळी असे आहे. संतोषने गळफास घेऊन आत्महत्या करण्यापुर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. या चिठ्ठीमध्ये त्याने स्पष्टपणे मोबाइल गेमच्या नादात स्वतःचा जीव संपवून आत्महत्या करत असल्याचा मजकूर लिहीला होता. या प्रकरणाचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

अशी घडली घटना

वाघोली येथील महाविद्यालयात वाणिज्य पदवीच्या दुसऱ्या वर्षास संतोष माळी शिक्षण घेत होता. तो मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील कागलचे रहिवासी असून त्याचे वडील हे एका कंपनीत नोकरी करतात आणि आई गृहिणी आहे. आई-वडील आणि आजीसोबत तो राहत होता. त्याला मोबाइल गेमच प्रचंड वेड असल्याने त्याचे इतर कोणत्याही गोष्टीकडे लक्ष नव्हते. पालकांनी त्याला अनेकदा समजावून सांगितले. मात्र, मोबाइल गेमच्या आहारी गेल्यानं तो कुणाचेच ऐकत नव्हता.
गुरुवारी घरात एकटा असताना मोबाइलवर गेम खेळून झाल्यानंतर त्याने आत्महत्येचे पाऊल उचलले.

दरम्यान, संतोषने आत्महत्या करण्यापुर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. यामध्ये त्याने ‘अवर सन विल शाईन अगेन’, ‘पिंजऱ्यातील ब्लॅक पँथर मुक्त झाला’ आणि ‘द एंड’ असे लिहिले आहे.

याप्रकरणी शोध सुरू 

लोणीकंद पोलिसांनी याप्रकरणी आत्महत्येची नोंद केली आहे. संतोषचा मोबाइल जप्त करण्यात आला आहे. पोलीस मोबाइलच्या आधारे आत्महत्येचं नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. तो मोबाइलवर नेमका कोणता गेम खेळायचा? कोणत्या गेमच्या नादात त्याने स्वतःचा जीव संपवला याचा शोध सध्या सुरू आहे.

First Published on: July 19, 2019 12:54 PM
Exit mobile version