लोकसहभागातून अर्थसंकल्प; मुंबईकरांना लेखी सूचना पाठविण्याचे पालिकेचे आवाहन

मुंबई : मुंबई महापालिकेचा सन 2023 – 24 या आर्थिक वर्षांसाठी अंदाजित अर्थसंकल्प लोकसहभागातून तयार करण्यात येत आहे. हा अर्थसंकल्प 5 फेब्रुवारीपर्यंत सादर करण्यात येणार आहे. या अर्थसंकल्पात जनहितार्थ काही सूचना असतील तर मुंबईकरांनी त्या सूचना येत्या 28 जानेवारीपर्यंत लिखित स्वरूपात पालिका मुख्यालयातील प्रमुख लेखापाल (वित्त) कार्यालयाकडे, चौथा मजला येथे अथवा bmcbudget.suggestion@mcgm.gov.in या ई मेलवर पाठवाव्यात, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या सूचना योग्य असतील तर त्यांचा वापर अर्थसंकल्पासाठी नक्कीच करण्यात येईल, असे आश्वासनही पालिकेने दिले आहे.

आशिया खंडातील सर्वात श्रीमंत असलेल्या व विविध बँकात तब्बल 92 हजार कोटींच्या मुदतठेवी असलेल्या मुंबई महापालिकेच्या वतीने सन 2023 – 24 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प तयार करण्यात येत आहे. या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये लोकसहभाग असावा, यासाठी महापालिका प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने मुंबई महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी विकासाला चालना देणाऱ्या व लोकहीतवादी सूचना असतील तर त्या सूचना bmcbudget.suggestion@mcgm.gov.in या ई – मेलवर 28 जानेवारपर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

गतवर्षी 3 फेब्रुवारी 2022 रोजी आयुक्त इकबाल चहल यांनी तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव व तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांना 45,949.21 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. सन 2021च्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत 2022चा अर्थसंकल्प हा 6,910.38 कोटी रुपये एवढ्या जास्त रकमेचा होता. यंदाचा अर्थसंकल्पही हा करवाढ व दरवाढ नसलेला आणि नफ्याचा असण्याची शक्यता आहे. मुंबईकरांच्या हिताच्या योजनांवर अधिक भर दिला जाण्याची शक्यता आहे.

मुंबई महापालिकेची निवडणूक लांबली आहे. सध्या पालिका स्थायी समिती, सभागृह अस्तित्वात नाही म्हणजे कोणी नगरसेवक, समिती अध्यक्ष आणि महापौर पदावर नाहीत. नव्याने निवडणूक होईपर्यंत पालिकेवर आयुक्त इकबाल चहल यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे यंदाचा अर्थसंकल्प प्रशासक आणि आयुक्त इकबाल चहल हे त्यांच्या अधिकारात सादर करतील.

हेही वाचा – अल्पसंख्याक समाजाबाबत बेछूट विधानं करू नका; पंतप्रधान मोदींची नेत्यांना सूचना

First Published on: January 18, 2023 9:29 PM
Exit mobile version