शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार : 18 जणांना राज्यपालांनी दिली शपथ

शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार : 18 जणांना राज्यपालांनी दिली शपथ

मुंबई : शिंदे – फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा बहुप्रतीक्षित विस्तार आज अखेर झाला. राजभवनातील दरबार हॉलमध्ये झालेल्या या सोहळ्यात एकूण 18 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यात शिवसेना शिंदे गट आणि भाजपाच्या प्रत्येकी 9 आमदारांचा समावेश होता. सर्वप्रथम भाजपाच्या आमदारांनी शपथ घेतली. त्यात प्रामुख्याने राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील यांचा समावेश होता. तर, शिवसेनेच्या शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील यांनी पहिली शपथ घेतली. त्यानंतर दादा भुसे व संजय राठोड यांच्यासह इतरांनी शपथ घेतली. या शपथविधीमुळे मुख्यमंत्री व उपमु्ख्यमंत्री यांच्यासह एकूण मंत्र्यांची संख्या 20 झाली आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात आणखी 22 जणांना संधी मिळेल.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून राजकीय वातावरण तापले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत विचारले असता, लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, हेच उत्तर प्रत्येकवेळी देत होते. तर दुसरीकडे, नवे सरकार स्थापन होऊन एक महिना उलटून गेल्यानंतरही मंत्रिमंडळात मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशिवाय इतर कोणत्याही मंत्र्याचा शपथविधी न झाल्याने विरोधी पक्षांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला.

हा शपथविधी सोहळ्याची वेळ सकाळी 11 वाजताची निश्चित करण्यात आली होती. परंतु राज्यपाल भगतसिंह कोश्यारी 15 मिनिटे उशिराने पोहोचले. 11.15 वाजता सुरू झालेला हा सोहळा दुपारी 12 वाजता संपन्न झाला. ठाकरे सरकारमधील शंभूराज देसाई आणि अब्दुल सत्तार यांना तर, फडणवीस सरकारमधील रवींद्र चव्हाण व दीपक केसरकर यांना कॅबिनेटपदी बढती देण्यात आली आहे. तथापि, विधान परिषदेतील भाजपा तसेच शिंदे गटातील एकाही सदस्याचा, महिला आमदाराचा या विस्तारात समावेश नव्हता. तसेच या सरकारला पाठिंबा देणारे इतर घटक पक्ष आणि अपक्ष आमदारांनाही या टप्प्यात संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे बच्चू कडू, राजेंद्र येड्रावकर यांना मंत्रिमंडळापासून दूरच राहावे लागले आहे.

भाजपाचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी पहिली शपथ घेतली. त्यानंतर सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, डॉ. विजयकुमार गावित, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, सुरेश खाडे, संदीपान भुमरे, उदय सामंत, तानाजी सावंत, रवींद्र चव्हाण, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, अतुल सावे, शंभुराज देसाई आणि मंगलप्रभात लोढा यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.

या नव्या मंत्र्यांकडे कोणत्या खात्याची जबाबदारी सोपविली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 17 ते 23 ऑगस्टदरम्यान राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन होण्याची शक्यता आहे. त्यात या नव्या मंत्र्यांना विरोधकांच्या आक्रमक भूमिकेचा सामना करावा लागेल.

First Published on: August 9, 2022 12:10 PM
Exit mobile version