मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाची बैठक संपन्न; ‘या’ मुद्द्यांवर झाली चर्चा

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाची बैठक संपन्न; ‘या’ मुद्द्यांवर झाली चर्चा

राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यावेळी मंत्रिमंडळाच्या बैठकीत खरीप हंगामाबाबत गांभीर्याने आढावा घेण्यात आला. तसेच राज्यातील पेरण्याची स्थिती समाधानकारक नसल्याची माहिती देण्यात आली. मागील वर्षी राज्यात आजच्या घडीला सरासरी २७० मिलीमीटर पाऊस झाला होता. त्या तुलनेत यंदा मात्र केवळ १३४ मिमी पाऊस झाला आहे. तसेच खरीपाखालील क्षेत्रापैकी केवळ १३ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत.

राज्यात ४९६ टँकर्सने पाणीपुरवठा

राज्यात २७ जून अखेर ६१० गावे आणि १२६६ वाड्यांना ४९६ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये शासकीय टँकर्सची संख्या ६६ तर खाजगी टँकर्सची संख्या ४३० इतकी आहे. पावसाला सुरुवात झाल्यामुळे मागील आठवड्याच्या तुलनेत टँकर्सची संख्येत काहीशी घट झालेली आहे. तर २८ जूनअखेर राज्यातील धरणातील एकूण पाणीसाठा २१.८२ टक्के इतका आहे.

राज्यातील विभागात पाणीसाठी किती?

विभागवार पाणीसाठ्यामध्ये अमरावती विभागातील प्रकल्पात ३३.८० टक्के, मराठवाडा विभागात २७.१० टक्के, कोकण विभागात ३४.४३ टक्के, नागपूर विभागात २६.८१ टक्के, नाशिक विभागात २०.०२ टक्के, पुणे विभागात १२.३५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

शहरात होणाऱ्या कमी पावसामुळे पाणीपुरवठा देखील कमी होऊ शकतो. उद्या नगर विकास खात्याचा कार्यभार असलेले मंत्री सुभाष देसाई हे सर्व पालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधून पाणी पुरवठ्याचे नियोजन कसे केले जाईल, याबाबत आढावा घेणार आहेत.


हेही वाचा : दगाफटका केल्यानंतरही मुख्यमंत्र्यांकडून बंडखोरांना परत येण्याचं आवाहन – आदित्य


 

First Published on: June 28, 2022 9:21 PM
Exit mobile version