सावधान! तुमच्या शेजारीही असू शकतो करोनाग्रस्त रुग्ण

सावधान! तुमच्या शेजारीही असू शकतो करोनाग्रस्त रुग्ण

कोरोना व्हायरस

खोकला, घसा खवखवणे आणि तीव्र ताप ही करोनाची लक्षणे असली तरी रोगप्रतिकारकशक्ती उत्तम असलेल्या व्यक्तीमध्ये ही लक्षणे दिसण्यास किमान पाच दिवसांचा कालावधी लागतो. तिसर्‍या टप्प्याच्या उंबरठ्यावर असलेल्या भारतामध्ये करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे यापुढे बाजारात किंवा सार्वजनिक ठिकाणी फिरताना सुदृढ वाटणारी व्यक्तीही करोनाबाधित असण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारात जाताना सोशल डिस्टन्सिंगची अंमलबजावणी करा अन्यथा आपल्या शेजारीही करोनाग्रस्त व्यक्ती उभा असू शकतो, अशी माहिती डॉक्टरांकडून देण्यात येत आहे.

करोनाला रोखण्यासाठी सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न होताना दिसत आहेत. भारत सध्या करोनाच्या तिसर्‍या टप्प्याच्या उंबरठ्यावर आहे. यामध्ये समाजातील लोकांकडून समाजातील लोकांमध्ये करोनाचा प्रसार होऊन त्याचा नेमका स्रोत शोधणे फार अवघड असते. अशावेळी काळजी घेणे फार महत्त्वाचे असते. परंतु अद्यापही नागरिकांमध्ये करोनाबाबत गांभीर्य नसल्याने करोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. दोन दिवसांत मुंबईचा आकडा दुपटीने वाढला असून राज्याचा आकडाही त्याच वेगाने वाढत आहे. अन्य देशांमध्ये वृद्धांना करोनाची लागण होण्याचे प्रमाण अधिक असताना भारत व महाराष्ट्रात 20 ते 40 वयोगटातील व्यक्तींना करोनाची लागण अधिक झाल्याचे दिसून येत आहे.

या वयोगटातील व्यक्तींची रोगप्रतिकारकशक्ती अधिक असल्याने त्यांच्यामध्ये पटकन करोनाचे लक्षण दिसून येत नाहीत. एखाद्या सुदृढ व्यक्तीमध्ये करोनाची लक्षणे दिसण्यासाठी किमान पाच दिवस लागतात. या कालावधीत हा रुग्ण अनेक ठिकाणी संचार करत असल्याने तो करोनाचा प्रसार वेगाने करत असतो. त्यामुळे तुमच्या शेजारी उभा असलेला धष्टपुष्ट व्यक्तीही करोनाबाधित असू शकतो. तिसर्‍या टप्प्याच्या उंबरठ्यावर असलेल्या भारतातील प्रत्येक व्यक्तीने बाजारात जाताना काळजी घेत सोशल डिस्टन्सिंग राखणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. तसेच काही दिवस घरातच राहण्यावर भर देणे गरजेचे असल्याचेही त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे.

करोनाची लागण झालेल्या व्यक्तीमध्ये पाच दिवसांनंतर लक्षणे दिसण्यास सुरुवात होते. लक्षणे दिसल्यावरच नागरिक चाचणी करून घेतात. मात्र तोपर्यंत ती व्यक्ती सर्वत्र फिरत असेल तर करोनाचा प्रसार होतो. त्यामुळे नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंंगचे पालन करण्याबरोबरच स्वतः ला घरात बंद करून घेणे आवश्यक आहे.
– शिवकुमार उत्तुरे, अध्यक्ष, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलिंग.

First Published on: April 7, 2020 6:52 AM
Exit mobile version