राज्य सरकारकडून सेलिब्रेशन, तर केंद्राकडून नागरिकांना खबरदारीच्या सूचना

राज्य सरकारकडून सेलिब्रेशन, तर केंद्राकडून नागरिकांना खबरदारीच्या सूचना

चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा एकदा उद्रेक झाला आहे. चीनसह जपान आणि अमेरिकेमध्येही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढत होताना दिसत आहे. चीनमध्ये कोरोनाच्या BF.7 व्हेरिएंटचे रूग्ण वाढत असताना केंद्र आणि राज्यांनीदेखील तयारी सुरू केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठका घेतल्या. दरम्यान, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनाही महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेला खबरदारीचे घेण्याचे आवाहन केले आहे. परंतु तळीरामांसाठी आता राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

यंदा नववर्ष आणि ख्रिस्तमसच्या पार्श्वभूमीवर राज्यातली दारूची दुकाने पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्यप्रेमींसाठी ही मोठी घोषणा केली आहे. २४ डिसेंबर, २५ डिसेंबर आणि ३१ डिसेंबर हे तीन दिवस दारुची दुकानं पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू असणार आहेत. त्यामुळे राज्य सरकारने नागरिकांना जरी सेलिब्रेशन करण्यासाठी परवानगी दिली असली तरी केंद्र सरकारने खबरदारीच्या सूचना जारी केल्या आहेत.

केंद्राच्या मार्गदर्शक सूचना काय?

जगातील काही देशांमध्ये वाढती कोरोनाची रूग्णसंख्या पाहता केंद्र सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्यांना पत्र लिहून सणांच्या पार्श्वभूमीवर रूग्णसंख्येकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच टेस्टिंग, ट्रिटमेंट आणि ट्रेसिंगवर भर देण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडविया, नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, आरोग्य सचिव राजेश भूषण, गृह सचिव अजय कुमार भल्ला आणि अनेक वरिष्ठ अधिकारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीला उपस्थित होते.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना कोरोना नियमांचं पालन करण्याचं आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आलं आहे. तर लसीकरण पूर्ण करून बुस्टर डोस घ्यावा आणि टेस्टिंग, ट्रेसिंगचं प्रमाण वाढवण्याचे आदेश महापालिकेकडून देण्यात आले आहे.


हेही वाचा :‘त्या’ वेळी लोकेशन काय? सालियन मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरेंची ‘दिशा’भूल!


 

First Published on: December 23, 2022 8:41 PM
Exit mobile version