गणेश नाईकांची केंद्रीय यंत्रणेने चौकशी करावी – सुप्रिया सुळे

गणेश नाईकांची केंद्रीय यंत्रणेने चौकशी करावी – सुप्रिया सुळे

आपला आंतरराष्ट्रीय गुंडांशी संपर्क असल्याचे भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी जाहीर कार्यक्रमात कबुल केले आहे. एका राजकीय नेत्यांचे अंडरवल्डशी असलेल्या संबंधांमुळे राज्याच्या आणि देशाच्या सुरक्षा व्यवस्थेला धोका निर्माण झालेला आहे. ही बाब गांर्भीयाने घेऊन नाईक यांची केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे करण्यात येणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात उपस्थितांना मार्गदर्शन करताना सुप्रिया सुळे यांनी गणेश नाईक यांच्यावर जोरदार टिका केली. नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर गणेश नाईक यांनी गुन्हेगारी संबंधांचा केलेला गौप्यस्फोट हा शहरात दशहत माजविणारा आहे. त्यामुळे त्यांचा कोणकोणत्या गुन्हेगारी जगतातील डॉनबरोबर संबंध आहे, याची चौकशी होणे आवश्यक आहे. लोकसभेच्या आगामी अधिवेशनामध्ये हा प्रश्न आपण उपस्थित करणार आहोत, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. याप्रसंगी उत्पन्न शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, आमदार शशिकांत शिंदे, सचिव प्रशांत पाटील, जिल्हाध्यक्ष अशोक गावडे आदी उपस्थित होते.

महापौर महाविकास आघाडीचाच
नवी मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविणार आहेत. निवडणूक तोंडावर आलेली असताना कोणी कितीही दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही. महापौर हा महाविकास आघाडीचाच होणार आहे, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

नाईकांना घोडाच फिरवावा लागणार
चित्रपट अभिनेते राजकुमार यांच्या स्टाईलने घोडा फिरवत असल्याची गणेश नाईक यांची एक व्हिडिओ क्लिप सध्या सोशल मिडियावर व्हॉयरल होत आहे. महापालिकेतील सत्ता गेल्यानंतर नाईकांना काही कामच उरणार नाही. त्यांना फक्त घोडाच फिरवावा लागणार असल्याने आतापासूनच ते त्याचा सराव करीत आहेत, असाही तडाखा सुप्रिया सुळे यांनी यावेळी लगावला.

जिथे गेलात तिथेच रहा
जिथे गेलात तिथेच सुखी रहा, पुन्हा आमची माती करायला येऊ नका, असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट करून नाईकांना राष्ट्रवादीचे दरवाजे बंद आहेत, असे संकेत दिले. त्यामुळे गणेश नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार या चर्चेला पूर्ण विराम मिळाला आहे.

First Published on: February 20, 2021 2:00 AM
Exit mobile version