मंत्र्यांना डावलून मंत्रिमंडळात प्रस्ताव पाठवणाऱ्या सहसचिव सतीश सुपे यांची बदली!

मंत्र्यांना डावलून मंत्रिमंडळात प्रस्ताव पाठवणाऱ्या सहसचिव सतीश सुपे यांची बदली!

मंत्र्यांना अंधारात ठेऊन राज्य मंत्रिमंडळ बैठकीत गहू खरेदीचा प्रस्ताव तयार करणारे अन्न आणि नागरी पुरवठा विभागातील सहसचिव सतीश सुपे यांची गुरुवारी उचलबांगडी करण्यात आली. सुपे यांची वित्त विभागात बदली करण्यात आली आहे. दोन दिवसापूर्वी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गहू खरेदीचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. खुद्द अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना या प्रस्तावाबद्दल माहिती नव्हती. त्यानंतर आता सुपे यांची बदली करण्यात आली आहे. गेली सहा ते सहावर्ष सुपे अन्न नागरी-पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात कार्यरत होते. मात्र आता या बदली नंतर राज्याचे मुख्यालय हे सचिवालय नसून मंत्रालय असल्याची जाणीव करून दिल्याचे सिद्ध झाले आहे.

गेल्या ७ ते ८ वर्षांपासून राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा विभागात सहसचिव म्हणून सतीश सुपे कामकाज पाहत होते.अनेक वर्ष एका खात्यात असल्याने त्यांच्याकडे या खात्याच्या कामकाजाबाबत इत्यंभूत माहिती असल्याने आपला मनमानी कारभार करण्याचे प्रकार त्यांच्याकडून सातत्याने होत असल्याची बाब समोर आली आहे.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत रब्बी गहू खरेदीचा प्रस्ताव चर्चेला आला. त्या प्रस्तावावर अन्न व नागरी पुरवठा मंत्री म्हणून छगन भुजबळ यांची सही नव्हती. स्वत: भुजबळ यांनीही या बैठकीत आपल्याला याबद्दल कोणतीच माहिती नसल्याचे सांगितल्याने मंत्रिमंडळ बैठकीतले सगळेच मंत्री अवाक झाले होते. काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी तर बैठकीतच हा अत्यंत चुकीचा पायंडा पाडला जात असून, आपल्या इतक्या वर्षांच्या मंत्रीपदाच्या कारकिर्दीत असा प्रकार आपण अनुभवला नसून सध्या जे सुरू आहे, ते काही ठीक नाही असा शेराही मारला होता. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री जयंत पाटील यांनी संबंधित मंत्र्याला विश्वासात न घेताच परस्पर हा विषय मंत्रिमंडळ बैठकीत आलाच कसा? असा सवाल केला होता. तसेच, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बहुसंख्य मंत्र्यांनी आमच्या खात्याचे सचिव परस्पर निर्णय घेऊन टिप्पणी सादर करतात अशी तक्रार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोरच केल्याचे समोर आले होते. मात्र यावेळी त्या बैठकीला उपस्थित असलेल्या मुख्य सचिव अजोय मेहता आणि अन्न-नागरी पुरवठा सचिव अधिकाऱ्यांकडे कोणतेही उत्तर नव्हते. अखेर आज सहसचिव सतीश सुपे यांची वित्त विभागात बदली करण्यात आली आहे. राज्याच्या अन्न,नागरी पुरवठा विभागाच्या सचिव पदावर सचिव म्हणून संजय खंदारे हे कामकाज बघत आहे.


हे ही वाचा – निर्दयी! पर्यटकांच्या सेल्फीसाठी बछड्याचे पायच तोडले!


 

First Published on: June 11, 2020 7:55 PM
Exit mobile version